कारखाना बंद मात्र राजकारण सुरू
विठ्ठल ची वार्षिक सभा अन् निवडणूक गाजतेय, सभासदांना प्रतीक्षा बिलाची
पंढरपूर तालुक्याच्या विकासात ज्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने नेहमीच भर घातली त्या संस्थेची सध्याची अवस्था बिकट आहे. कर्जाचा मोठा डोंगर या कारखान्यावर असून या हंगामात तो गाळपात ही उतरू शकला नाही. या बंद कारखान्याची वार्षिक सभा 30 मार्च रोजी होत असून ती ऑनलाइन न घेता ऑफलाइन घ्यावी अशी मागणी वाढत आहे. मात्र आता यात बदल होणार नाही. तर दुसरीकडे कारखान्याची निवडणूक प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याने यासाठी सर्वच गटांनी तयारी सुरू केली आहे. 2020-21 च्या हंगामातील सभासदांची 30 कोटी रूपयांची थकबाकी कारखान्याकडे असून शेतकरी या बिलाच्या प्रतीक्षेत अनेक महिने आहेत. तर कामगार वेतन कधी मिळणार? म्हणून वाट पाहातेय.
कारखान्यावर राज्य सहकारी शिखर बँकेचे मोठे कर्ज असल्याने जप्तीची कारवाई या बँकेने सुरू केली होती. मात्र सहकारमंत्र्यांनी मध्यस्थी केली आणि काही काळ दिलासा मिळाला. मात्र या कारखान्यात शिल्लक असणार्या एक लाख नऊ हजार साखर पोत्यांची विक्री करून काही रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न बँकेने सुरू केला. तर दुसरीकडे शेतकर्यांच्या उसाचे देणे अगोदर देणे आवश्यक असल्याने साखर आयुक्तांनी जिल्हा महसूल प्रशासनाला आरआरसी कारवाई करण्यास सांगितले. त्यानुसार पंढरपूरच्या तहसीलदारांनी गोदाम सील केली व साखर विक्रीची प्रक्रिया सुरू केली मात्र यास बँकेने विरोध करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याच बरोबर मागील हंगामाती बिल मिळावे, या मागणीसाठी सभासद ही न्यायालयात पोहोचले आहेत. यावर सुनावणी होत असून लवकरच निकालाची प्रतीक्षा आहे.
दरम्यान कारखान्याच्या निवडणुकीचे वारे आता जोराने वाहू लागले असून पुढील महिन्यात यास सुरूवात होईल. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे या विठ्ठल परिवाराला नेहमीच साथ करत आले आहेत. त्यांनीही निवडणुकीत जो कोणी विजयी होईल त्यास पाठिंबा देवून सहकार्य करू अशी भूमिका घेतली आहे. सर्वच गटाच्या नेत्यांनी त्यांची आशीर्वादासाठी भेट घेतली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात चार साखर कारखाने चालविणार्या डीव्हीपी उद्योग समुहाचे प्रमुख अभिजित पाटील हे या कारखाना निवडणुकीत उतरणार हे निश्चित आहे. त्यांनी सभासदांशी संपर्क सुरू केला आहे. तर दुसरीकडे कारखान्याचे संचालक युवराज पाटील यांनी कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालकेंपासून दूर जाते स्वतंत्र पॅनल लावण्याची तयारी केली आहे. तर भालके व सहकार शिरोमणी कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे हे एकत्र येवून या निवडणुकीत उतरतील असे चित्र आहे. येत्या काही दिवसात याबाबतचे चित्र स्पष्ट होईल.
विठ्ठल कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा 30 मार्च रोजी ऑनलाइन होत असून ती ऑफलाइन व्हावी, अशी मागणी होत आहे. मात्र कोरोनाचा काळ संपला नसल्याने यास परवागनी मिळालेली नाही. प्रशासनानेही ऑनलाइन सभा घेण्याची सूचना केली आहे. तरीही संचालक युवराज पाटील हे ऑफलाइन सभेसाठी आग्रही आहेत. त्यांनी साखर आयुक्तांना देखील निवेदन दिले आहे. विद्यमान संचालक मंडळात भालके विरूध्द युवराज पाटील असा सामना रंगलेला दिसत आहे. अध्यक्ष भगीरथ भालके हे सभासदांचे थकीत बिल मिळावे म्हणून सतत पुणे व मुंबईच्या दौर्यावर असतात. त्यांनी आपण कामगार व सभासदांची देणी दिल्यानंतर सविस्तरपणे माध्यमांशी बोलू अशी प्रतिक्रिया देताना दिली व याचवेळी अनेक काहींचा भांडाफोड आपण करणार असल्याचा इशारा ही दिला आहे.