भगीरथदादा जमत नसलं तर राजीनामा द्या..युवराजदादांची मागणी, विठ्ठल कारखान्यातील संचालक मंडळाचा वाद पुन्हा ऐरणीवर
पंढरपूर – गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला असून ज्येष्ठ संचालक युवराज पाटील यांनी चेअरमन भगीरथ भालके यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ऊस उत्पादकांसह कारखान्याच्या विविध घटकांची थकलेली देणी देण्यावरून पुन्हा शाब्दिक ठिणगी पडली आहे.
23 ऑगस्टच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ऊस उत्पादक तसेच वाहतूकदार व कामगारांची देणी येत्या आठ दिवसात दिली जातील अशी चर्चा झाली होती. मात्र यास आठ दिवस उलटून गेले तरी याची अंमलबजावणी न झाल्याने आपण स्पष्टपणे आपली भूमिका मांडत असल्याचे युवराज पाटील यांनी सांगितले. चेअरमनसाहेब सर्वांना जसे नॉट रिचेबल आहेत तसेच ते संचालक मंडळाला ही नॉट रिचेबल असल्याचा आरोप करत पाटील यांनी सांगितले की, जमेल नसेल तर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा व बाजूला सरकावे. संचालक मंडळ आपला निर्णय घेईल. जरी सभासदांनी मला बाजूला व्हायला सांगितले तर युवराज पाटील ही बाजूला होतील अशी स्पष्ट भूमिका युवराज पाटील यांनी मांडली. शेतकर्यांचा हा राजवाडा कै. औदुंबरआण्णा पाटील, कृष्णात पुरवत, यशवंतभाऊ पाटील, सुधाकरपंत परिचारक, वसंतराव काळे यांच्यासह अनेकांनी कष्टाने उभा केला आहे. याची दुरवस्था बघवत नाही म्हणून आपण ही भूमिका घेतल्याचे ते म्हणाले.
दरम्यान युवराज पाटील यांनी भगीरथ भालके यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याने पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात खळबळ उडाली असून ऊसबिलासह विविध थकीत देण्यांचा विषय आता ऐरणीवर आला आहे. भगीरथ भालके हे आर्थिक गणित जुळविण्यासाठी मुंबईत असल्याचे सांगितले जाते. ते गेल्या काही दिवसांपासून संपर्कात नसल्याने संचालक मंडळातील सदस्य ही आता नाराज होत असल्याचे दिसते.
कै. भारत भालके यांच्या काळातही कारखान्याला आर्थिक जुळवाजुळव करावी लागत होती मात्र ते काहीही करून यातून मार्ग काढत असल्याचे युवराज पाटील यांनी यावेळी सांगितले. दरम्यान कै. भारत भालके यांच्या निधनानंतरच कारखान्याच्या संचालक मंडळात मतभेद होते हे दिसत होते. युवराज पाटील यांनी अध्यक्षपदावर हक्क सांगितला होता मात्र राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप करून भगीरथ भालके यांना संधी दिली. यानंतर विधानसभा पोटनिवडणुकीत भगीरथ भालके यांना पराभूत व्हावे लागले व यानंतर हा वाद आता विकोपाला जात असल्याचे दिसत आहे. येथील राष्ट्रवादी काँगे्रस पक्षात ही गटबाजी जास्त आहे. तर आता कारखान्यात ही संचालक मंडळात नाराजीचा सूर उमटू लागला आहे.