पंढरपूर तालुक्यात स्पर्धा वाढल्याने तडजोडीच्या राजकारणाला सुरूवात !
पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात आता स्पर्धा वाढू लागल्याने सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये तडजोडीला महत्व येवू लागले आहे. सुरू असणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सर्वच गटांनी अर्ज भरल्याने सत्ताधारी परिचारक गटाने तडजोडीचा प्रस्ताव ठेवला आहे. तर दुसरीकडे येत्या काही दिवसात सुरू होणाऱ्या सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या रणधुमाळीत काळे गटाला नमोहरम करण्यासाठी अभिजित पाटील व ॲड. दीपक पवार एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बाजार समितीने माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या गटाचे एकहाती वर्चस्व असले तरी यंदाच्या निवडणुकीत विठ्ठल परिवार, काळे गट, अभिजित पाटील समर्थक यांच्यासह आमदार आवताडे गट यांनी अर्ज दाखल केल्याने बहुरंगी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान परिचारक यांनी विरोधकांना ही शेतकऱ्यांची संस्था बिनविरोध करण्यासाठी तडजोडीस तयार असल्याचे सांगितले आहे. यामुळे आता चर्चेसाठी कोण पुढे येणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. सध्या प्रशांत परिचारक व भगीरथ भालके यांची मंगळवेढ्यात समविचारी आघाडी असल्याने पंढरपूर बाजार समितीमध्ये ही परिचारक भालके व काळे गटाला संधी देतील ,अशी चर्चा आहे. येथील राजकारणात विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांना शह देण्यासाठी आता नवी समीकरण येत्या काळात दिसू लागणार हे निश्चित आहे.
बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार समाधान आवताडे समर्थकांनी ही उमेदवारी अर्ज भरले असून त्यांना परिचारक संधी देणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. परिचारक व अभिजित पाटील यांच्यात गटात समझोता होण्याची शक्यता अत्यंत धुसर आहे.
दरम्यान येत्या काही दिवसात सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होत असून यात सत्ताधारी कल्याणराव काळे यांना आव्हानं देण्याचा निर्णय विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी घेतला आहे. या निवडणुकीत काळे यांना सत्तेवरून बाजूला करण्यासाठी पाटील हे या कारखान्याचे माजी संचालक तथा काळे यांचे विरोधक ॲड. दीपक पवार यांना बरोबर घेण्याची शक्यता आहे. सध्या पाटील व पवार गट वेगवेगळे गावभेट दौरे करत आहेत. मागील निवडणुकीत येथे पवार गटासह डॉ.बी.पी.रोंगे यांनी पॅनल लावले होते. तिरंगी लढतीत काळे विजयी झाले होते. यामुळे आता विरोधी मतांची विभागणी टाळण्यासाठी अभिजित पाटील हे दीपक पवार, डॉ. रोंगे यांना बरोबर घेवून कल्याणराव काळे यांच्यासमोर आव्हानं उभे करतील असे दिसत आहे.
या निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यातील अभिजित पाटील विरोधी गट हे काळे यांच्या पाठीशी ताकद लावणार हे निश्चित आहे. पाटील हे सध्या विधानसभेची तयार करत असल्याने त्यांना रोखण्यासाठी त्यांचे विरोधक आता कामाला लागले आहेत. सध्याचे येथील राजकारण पाहिले तर तडजोडी करण्याशिवाय कोणत्याच गटाला पर्याय राहिलेला नाही.