राज्यात या 19 कारखान्यांनी दहा लाख टनापेक्षा जास्त ऊस गाळला, सोलापूर जिल्ह्यातील दोन कारखान्यांचा समावेश
पंढरपूर – राज्यातील 2022-23 चा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असून राज्यात केवळ सहाच कारखाने सुरू असून 204 बंद झाले आहेत. या हंगामात राज्यात 19 खासगी व सहकारी कारखान्यांनी दहा लाख मे टनापेक्षा जास्त उसाचे गाळप केले असून यात सोलापूर जिल्ह्यातील दोन कारखान्यांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्ह्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना पिंपळनेगर व अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील या दोन कारखान्यांनी दहा लाख मे. टनापेक्षा जास्त गाळप केले आहे. माढा तालुक्यातील आमदार बबनराव शिंदे हे अध्यक्ष असणारा विठ्ठलराव शिंदे कारखाना हा ऊस गाळपात सर्वात अग्रेसर असून या कारखान्यात 8.98 च्या साखर उतार्याने 18 लाख 41 हजार 824 मे. टन उसाचे गाळप होवून 16 लाख 52 हजार 800 क्विंटल साखर तयार झाली आहे.
राज्यात साखर उत्पादनात अग्रेसर राहण्याचा मान कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथील जवाहर साखर कारखान्याला मिळाला असून 12.30 टक्के साखर उतारा मिळवून या कारखान्याने 18 लाख 1 हजार 586 टन उसाचे गाळप करून 20 लाख 7 हजार 70 क्विंटल साखर उत्पादित केली आहे. यापाठोपाठ बारामती अॅग्रो इंदापूरने 16 लाख 43 हजार 907 लाख टन ऊस गाळला आहे. दहा लाख टनापेक्षा जास्त ऊस गाळप करणारे कारखाने पुढील प्रमाणे कंसात गाळप मे. टनात – गुरू कमोडिटी जरंडेश्वर कारखाना सातारा (16,27,030), इंडिकॅन अंबालिका शुगर (15,44,940), तात्यासाहेब कोरे वारणा (13,48,590 ), माळेगाव कारखाना बारामती (12,57,466), सोमेश्वर सहकारी बारामती (12,56,769), ज्ञानेश्वर सहकारी भेंडा (11,77,100), श्री दत्त सहकारी शिरोळ (11,48,675), गंगामाई इंडस्ट्रिज (10,79,016), एनएसएल माजलगाव (10,61,350), आर्यन मल्टिरीड एलएलपी (10,16,272), यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी (10,60,000 ), सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना अकलूज (10,56,780), बी.टी. संगमनेर सहकारी (10,15,560), दालमिया भारत शुगर पन्हाळा (10,15,131), दौंड शुगर बारामती (10,03,286), श्री दत्त इंडिया वसंतदादा सहकारी (10,00,930 मे. टन ).
या एकोणीस कारखान्यांपैकी बारामती अॅग्रो, गुरू कमोडिटी जरंडेश्वर, अंबालिका,गंगामाई, एनएसएल, आर्यन, दालमिया शुगर, दौंड शुगर हे कारखाने खासगी आहेत.