एसटी चालक आणि वाहकाचा प्रामाणिकपणा ; पाच लाखाचा ऐवज प्रवाशाला सुपूर्द
सोलापूर – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाची बॅग गाडीतच विसरली. त्यानंतर एसटीचे चालक आणि वाहक या दोघांच्याही लक्षात आल्यानंतर बॅग उघडून पाहिले तर सोने-चांदी ,रोख रक्कम आणि अन्य असा सुमारे चार ते पाच लाख रुपयांचा ऐवज त्यामध्ये असल्याचे निदर्शनास आला. बॅगेमध्ये संबंधित प्रवाशाचा मोबाईल नंबर सापडला. त्यावरून प्रवाशाला संपर्क करून चालक आणि वाहकाने त्यांचा लाख मोलाचा ऐवज परत देऊन प्रामाणिकपणा जपल्याची आनंददायी वार्ता सोलापूर डेपोमध्ये घडली आहे.
शनिवार १६ डिसेंबर रोजी हैदराबाद – सोलापूर या बसने उमरगा येथून नळदुर्ग पर्यंत बसवकल्याण रहाणापूर येथील ललिताबाई गोविंदराव भोसले या महिलेने प्रवास केला. मात्र उतरताना अनावधावाणे त्यांची बॅग गाडीतच राहिली. मात्र चालक मिलिंद चंदनशिवे आणि वाहक महेश विकास माने यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने बॅग मधील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला आणि प्रवासी महिलेला बोलावून घेतले. सुमारे चार ते पाच लाख रुपयांचे सोने, चांदी,रोख रक्कम यासह अन्य ऐवज आगार प्रमुख अशोक बनसोडे ,पोलीस हवालदार शिंदे यांच्या समक्ष प्रवासी महिलेला सुपूर्द करण्यात आला. या सुखद आणि प्रामाणिकपणाबद्धल चालक आणि वाहकाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे .