राज्य

तक्रारीनंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीने व्यवस्थापकांना सक्तीच्या रजेवर पाठवले

पंढरपूर दि.23 :- दर्शनरांगेतील बॅरिकेटिंग कामाच्या ई निविदे संदर्भात प्राप्त तक्रारी व गोशाळेतील नवजात वासराच्या मृत्यू प्रकरणी चौकशीसाठी ॲड. माधवीताई निगडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून, सदर समिती पुढील 8 दिवसात चौकशी अहवाल देणार आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर मंदिर समितीच्या सभेत पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील कार्यालयात दि. 23 जुलै रोजी सह अध्यक्ष औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस सदस्या शकुंतलाताई नडगिरे, डॉ दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे, ॲड माधवीताई निगडे, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, अतुलशास्त्री भगरे गुरूजी, ह.भ.प.शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व लेखा अधिकारी मुकेश अनेचा उपस्थित होते.

दर्शनरांगेतील बॅरिकेटींग कामाच्या ई निविदे संदर्भात प्राप्त तक्रारी व गोशाळेतील नवजात वासराच्या मृत्यू प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याच्या दृष्टीने मंदिर समितीच्या सदस्या ॲड. माधवीताई निगडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली. त्यामध्ये शकुंतलाताई नडगिरे, डॉ.दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर यांचा सदस्य पदावर समावेश करण्यात आला आहे. सदरची समिती पुढील 8 दिवसात चौकशी करून मुख्य समितीसमोर अहवाल सादर करणार आहे. सदर चौकशी पूर्ण होऊन पुढील निर्णय होईपर्यंत व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.

दर्शनरांगेतील बॅरिकेटिंग कामाच्या ई निविदे संदर्भात श्री पुरुषोत्तम सग्गम, सोलापूर यांनी आर्थिक फसवणूक झाल्याच्या तक्रारी संदर्भात समाजमाध्यमांत बातमी प्रसिध्द झाली होती व काही ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. त्या अनुषंगाने मंदिर समितीचे व्यवस्थापक  मनोज श्रोत्री यांना नोटीस बजावून खुलासा घेण्यात आला होता. तसेच गोशाळेतील नवजात वासराच्या मृत्यूबाबत देखील बातमी व व्हिडीओ समाजमाध्यमांत प्रसिध्द झाला होता. त्या अनुषंगाने देखील योगेश पाठक व तानाजी जाधव यांच्यावर पंढरपूर शहर पोलीस ठाणेमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पशुवैद्यकीय अधिकारी व तत्कालिन विभाग प्रमुख डॉ. प्रशांत सर्वगोड व सध्याचे विभाग प्रमुख पांडुरंग बुरांडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. सदरच्या दोन्ही घटना मंदिर समितीने गांभीर्याने घेतल्या असून, या दोन्ही घटनांची सखोल चौकशी करुन दोषी असणा-या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

Header
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close