राज्य

विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजा नोंदणीस भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

संकेतस्थळावर जर्मनी, कॅनडा, नेपाळ, चीन आदी सुमारे 20 देश विदेशातून सुमारे 17000 व्ह्यूज नोंदविले,

पंढरपूर दि.२५: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर यांच्या वतीने भाविकांना अधिक सुलभ व पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेच्या विविध पूजांसाठी ऑनलाईन नोंदणी प्रणाली सुरू करण्यात आली आहे. दि. ०१ एप्रिल ते ३१ जुलै २०२६ या कालावधीतील पूजांसाठीची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया दि. २५ मार्च २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजल्यापासून सुरू करण्यात आली असून या उपक्रमास भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळामार्फत भाविकांना घरबसल्या पूजेची नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुरू करण्यात आलेल्या या प्रणालीमुळे राज्यासह देशातील विविध भागांतील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेमुळे भाविकांचा वेळ व श्रम वाचले असून पूजेच्या आरक्षणात पारदर्शकता निर्माण झाली आहे.

दि. १ एप्रिल ते ३१ जुलै, २०२६ या कालावधीतील सण, उत्सव व गर्दीचे दिवस वगळून इतर दिवशीच्या श्रींच्या नित्यपूजा, पाद्यपूजा व महानैवेद्य सहभाग योजना तसेच माहे एप्रिल, २०२६ मधील तुळशी अर्चन पूजा ऑनलाइन नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये सर्व पूजांची नोंदणी अल्पावधीत पूर्ण झाली आहे. यामध्ये श्री विठ्ठल नित्यपूजा – १४८, श्री रुक्मिणीमाता नित्यपूजा – १५०, पाद्यपूजा – ३५४, तुळशी अर्चन पूजा – १०४० तसेच महानैवेद्य सहभाग योजना – १४५ अशा सर्व पूजांसाठी भाविकांनी मोठ्या उत्साहाने नोंदणी केली आहे.

श्री विठ्ठल व श्री रुक्मिणीमातेच्या नित्यपूजेसाठी अनुक्रमे रु.२५०००/-, रू.११०००/- तसेच पाद्यपूजेसाठी रू.५०००/- व तुळशी अर्चन पूजेसाठी रू.२१००/- तसेच महानैवेद्य सहभाग योजनेसाठी रू.७०००/- इतके देणगी मुल्य आहे. यामधून सुमारे ८८ लक्ष इतके देणगीमूल्य जमा झाले आहे.या ऑनलाईन प्रणालीमुळे मंदिर समितीच्या सेवांमध्ये सुलभता, पारदर्शकता आणि कार्यक्षमतेत वाढ झाली असून भाविकांना अधिक सोयीस्कर पद्धतीने सेवा उपलब्ध होत आहेत. भाविकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता भविष्यातही अशा तंत्रज्ञानाधारित सुविधा अधिक प्रभावीपणे राबविण्याचा मंदिर समितीचा मानस असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंगडम, युनायटेड अरब अमिराती, जर्मनी, कॅनडा, नायजेरिया, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड, नेपाळ, हंगेरी, नॉर्वे, काँगो (किन्शासा), फ्रान्स, कुवेत, स्वीडन, चीन, श्रीलंका आदी सुमारे २० देशांमधून संकेतस्थळास भेटी (व्ह्यूज) प्राप्त झालेल्या असून देश-विदेशातून एकूण सुमारे १७,००० व्ह्यूज नोंदविण्यात आले आहेत.सदर ऑनलाईन प्रणालीद्वारे नोंदणी झालेल्या पूजांबाबतचा संपूर्ण डेटा, संबंधित लोकेशन माहिती, आयपी अॅड्रेस, फेल्ड (अयशस्वी) नोंदणीचा तपशील तसेच इतर अनुषंगिक तांत्रिक माहिती मंदिर समितीकडे उपलब्ध असून त्याची संगणकीय नोंद सुरक्षित स्वरूपात ठेवण्यात आलेली आहे. संपूर्ण पूजा नोंदणी प्रक्रिया अत्यंत पारदर्शक, संगणकीकृत व नियमानुसार पार पडलेली आहे. सदरची संगणक प्रणाली टाटा कन्सल्टंट सर्व्हिसेस यांच्याकडून विकसित करण्यात आली आहे.

पूजा नोंदणी प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार अथवा घोटाळा झालेला नाही.तथापि, काही वर्तमानपत्रांनी “विठ्ठल-रुक्मिणीच्या पूजेचा काळाबाजार” या मथळ्याखाली कोणतीही शहानिशा अथवा वस्तुस्थितीची पडताळणी न करता बातमी प्रसिद्ध करून मंदिर समितीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सदर बाब गंभीर स्वरूपाची असून संबंधित वर्तमानपत्राच्या संपादकास कायदेशीर नोटीस देण्याची तसेच आवश्यकतेनुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी श्री राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

Header
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close