कोरोना व लाळखुर्कतमुळे पंढरपूरच्या कार्तिकी यात्रेतील जनावरांचा बाजार रद्द
पंढरपूर – कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव व जनावरांमध्ये वाढत असलेला लाळ खुर्कत आजार पाहता पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेत भरणारा जनावरांचा बाजार होणार नाही. यास परवानगी नसल्याचे बाजार समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे. यामुळे पंढरीत भरणारा घोडे बाजारही होणार नाही.
या बाजारात जनावरांची व माणसांची मोठया प्रमाणात होणारी गर्दी व याच ठिकाणी जनावर व माणस मुक्कामी राहत असल्याने तसेच सध्या जनावरांमध्ये लाळ खुर्कत रोगाचा प्रादुर्भाव असल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कार्तिक यात्रा कालावधीत दि.11/11/2021 ते दि.18/11/2021 अखेर भरणारा जनावरांचा बाजार या बाजार समितीच्या वतीने रद्द करण्यात आलेला आहे.
शेतकरी, पशुपालक, जनावरांचे व्यापारी व संबंधित घटकांनी कार्तिक यात्रा जनावरांच्या बाजारात कृपया आपली जनावरे खरेदी-विक्रीसाठी आणू नयेत. याची नोंद घ्यावी व बाजार समितीस सहकार्य करावे असे आवाहन बाजार सभापती दिलीप (आप्पा) तुकाराम घाडगे व उपसभापती विवेक (काका) देविदास कचरे यांनी केले आहे.
छायाचित्र: संग्रहित