विशेष

गळीत हंगाम तोंडावर आला तरी ऊसबिल थकविलेल्या कारखान्यांची भूमिका “थंडच”, धुराडे पेटणार का नाही? सभासद व कामगारांमध्ये संभ्रम  


पंढरपूर – यंदा राज्यात मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध असल्याने राज्य सरकारने 15 ऑक्टोंबरपासून कारखाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अनेक कारखान्यांमध्ये गळीत हंगामपूर्व कामे प्रगतिपथावर असली तरी पंढरपूर भागातील विठ्ठल व भीमा यासारख्या कारखान्यांनी गेले अनेक महिने ऊसबिले थकीत ठेवल्याने य कारखान्यांची भूमिका काय? असा प्रश्‍न आता सभासदांना पडला आहे.
हंगाम सुरू करताना कारखान्यांना शेतकर्‍यांना मागील एफआरपीची रक्कम देणे बंधनकारक करण्यात आले आहे. जे कारखाने शेतकर्‍यांच्या उसाचा पैसा थकवतील त्यांना गाळप परवाना न देण्याचा निर्णय ही राज्य शासनाने घेतला आहे. यातच आता उसाचा कॅलिफोर्निया असणार्‍या पंढरपूर भागात थकीत बिलांसाठी आंदोलन झाली आहेत. भीमा कारखान्याची थकीत बिले मिळावीत अशी मागणी सतत होत असून भीमा बचाव संघर्ष समितीने आठ दिवसाची मुदत दिली असून पुढील काळात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. कामगारांचे पगार, निवृत्तीवेतनधारकांचे पैसे, भविष्य निर्वाह निधी यासह वेतनवाढीचा फरक अशा अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत. 28 कोटी रूपयांची थकीत ऊसबिले तातडीने देण्याचा आग्रह येथील सभासद करत आहेत.
दरम्यान पंढरपूर तालुक्यातील शेतकर्‍यांचा राजवाडा मानल्या जाणार्‍या गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यानेही ही शेतकर्‍यांना मागील हंगामातील ऊसबिलं देणे बाकी आहे. या कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके यांचा पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीनंतर सभासदांशी संवाद कमी झाल्याचे चित्र आहे. संचालक मंडळातही ऊसबिलावरून वाद उफाळून पुढे आले आहेत. संचालक युवराज पाटील यांनी तर चेअरमनपदावरून भालके यांनी दूर व्हावे अशी मागणी करून खळबळ  उडवून दिली आहे. या कारखान्याची ऊसबिलं मिळावीत अशी मागणी सतत शेतकरी संघटना करत आहेत. मात्र याबाबत मौनच बाळगले जात असल्याने कारखान्याची भूमिका गुलदस्त्यात असल्याचे दिसते.
नवीन हंगाम अगदी तोंडावर आला असून मिल रोलर पूजन, हंगामपूर्व मशीन दुरूस्ती व ओव्हरऑयलिंग यासह विविध कारखान्यातील कामे मागील लागणे आवश्यक असते. कारखाने कधी सुरू होणार हे शेतकर्‍यांना समजणे आवश्यक आहे.
यापूर्वी 2019-2020 चा गळीत हंगाम विठ्ठल असो की सहकार शिरोमणी कारखान्याला घेता आला नव्हता. यंदा सहकार शिरोमणी कारखान्याची तयारी झाली असून तेथे मिल रोलर पूजनही झाले आहे. या कारखान्याकडे ही एफआरपीची थकीत बाकी असून ती आदा करण्याची तयारी कारखान्याचे संचालक मंडळ करत आहे. राज्य सरकारकडून लवकरच गळीत हंगाम परवाने तसेच कारखाने सुरू करतानाच्या कर्जाची थकहमी जाहीर होईल. मागील वर्षी कै. आमदार भारत भालके यांनी प्रयत्न करून विठ्ठल व सहकार शिरोमणी कारखाने सुरू करून घेतले होते व यासाठी राज्य सरकारकडून कर्जांना थकहमी करून मिळवून घेतली होती. आता ही कल्याणराव काळे व भगीरथ भालके यांना सरकार दरबारी खूप प्रयत्न करावे लागणार हे निश्‍चित आहे.
ऊसदर थकबाकीचा विषय केवळ पंढरपूर तालुक्याचा नसून अन्य तालुक्यांमध्येही अशीच अवस्था आहे. काही कारखान्यांनी दर दिले आहेत तर काहींनी थकविले आहेत. 

Header

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close