व्यापक जनहिताच्या विविध योजनांचा विजयदादांकडून नवी दिल्ली आणि मुंबईत सतत पाठपुरावा
अकलूज – माळशिरस मतदारसंघातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी आमदारद्वय रणजितसिंह मोहिते पाटील व राम सातपुते हे प्रयत्नशील असतात. मात्र तरीही माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे ही सतत येथील योजना मार्गी लावण्यासाठी विविध मंत्र्यांकडे पाठपुरावा करताना दिसत आहेत. मध्यंतरी नवी दिल्लीत जावून त्यांनी अनेक प्रश्न सोडवून घेतले होते तर आता नीरा देवघर धरणाचे पाणी व मतदारसंघातील रस्त्यांच्या निधीसाठी प्रयत्न करत आहेत.
विजयसिंह मोहिते पाटील हे जनतेत मिसळणारे नेते म्हणून परिचित आहेत. सर्वसामान्य लोकांना सहज उपलब्ध होणारे “दादा” म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. राष्ट्रवादीपासून दूर गेल्यावर त्यांनी सक्रिय राजकारणापासून आपल्याला दूर ठेवले होते. मात्र आता पुन्हा ते विविध विषयांचा पाठपुरावा करताना दिसत आहेत. दोनच दिवसापूर्वी त्यांन नीरा देवघर धरणाचे पाणी माळशिरस तालुक्यातील गावांना लवकर उपलब्ध व्हावे यासाठी योजनेला निधी देण्याची मागणी करण्यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली होती. देवघर धरणाचे काम पूर्ण झाले असून 198 कि.मी. लांबीचा उजवा कालवा आहे. त्यापैकी 65 कि.मी. लांबीची कामे पूर्ण झालेली आहेत. फलटण व माळशिरस तालुक्यातील कालवा बांधणी कामे निधी अभावी अपूर्ण आहेत. या धरणाचे पाणी आता बंद पाइपलाइनद्वारे मिळणार असून ही कामं लवकरात लवकर व्हावीत अशी मागणी मोहिते पाटील यांनी जयंत पाटील यांच्याकडे केली असता त्यांनी तत्काळ कार्यवाहीचे आदेश दिले व या संबधी कामाचा आढावा अधिकार्यांनी स्वतः भेटून देण्याच्या सूचना केल्या आहेत.
या योजनेचा फायदा गिरवी, पिंपरी, लोणंद, कण्हेर, इस्लामपूर, रेडे, मांडकी, गोरडवाडी,धर्मपूरी, कारुंडे, मोरोची, नातेपुते, मांडवे, मोटेवाडी, दहिगांव, पिंपरी, फडतरी, मोहितेवाडी, मांडकी, इस्लामपूर, गिरवी (सोनमळा), गारवाड या गावांना होणार आहे. ही गाव डोंगराळ भागातील दुष्काळी असून पाण्यावाचून कायम वंचित आहेत.
तर बुधवारी मोहिते पाटील यांनी माळशिरस तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते खराब झाले याच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून 14 कोटी 40 लाखाचा निधी वितरीत करावा अशी मागणी मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे . याबाबत चव्हाण यांनी सकारात्मकता दर्शविली असल्याचे मोहिते पाटील यांनी सांगितले आहे .
तालुक्यातील बोरगाव ते वेळापूर या रस्त्यासाठी 60 लाख , फळवणी ते शिंगोर्णी रस्त्या 4 कोटी , कोंडबावी – पाटीलवस्ती ते यशवंतनगर रस्त्यासाठी 2 कोटी , जाधववाडी ते पुरंदावडे रस्त्यासाठी 80 लाख , कोथळे – कारुंडे ते राष्ट्रीय महामार्ग रस्त्यासाठी 4 कोटी व आसरा ढाबा ते तरंगफळ या रस्त्यासाठी 3 कोटी असे एकूण 14 कोटी 40 लाख रुपये मंजूर करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान मध्यंतरी विजयसिंह मोहिते पाटील यांनी नवी दिल्लीत जात विविध विभागाच्या मंत्र्यांकडून येथील योजनांबाबत चर्चा केली होती. रेल्वे, राष्ट्रीय महामार्गाबाबतचे प्रश्न सोडवून घेतले होते. केंद्रात भाजपाचीच सत्ता आहे मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकार असले तरी यातील सर्वच मंत्र्यांचे मोहिते पाटील यांच्याशी चांगले संबंध आहेत. अनेक वर्षे ते एकत्रच काम करत होते यामुळे विजयदादांची कामे थांबत नाहीत. अकलूज नगरपरिषद व्हावी ही मागणी घेवून त्यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली होती.