विशेष

पर्जन्यराजाच्या लहरीपणामुळे सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी संथगतीने भरतेय


पंढरपूर- यंदा उजनी व भीमा खोर्‍यात कमी प्रमाणात पाऊस झाला असल्याने सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणारे उजनी धरण सप्टेंबरच्या मध्याला उपयुक्त पाणी पातळीत ऐंशी टक्के भरत आले आहे. या प्रकल्पाला पाणी देवू शकणारी बहुतांशी प्रकल्प आता शंभर टक्के भरले आहेत.
यंदा भीमा खोर्‍यात गतवर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी आहे. उजनी जलाशयावर यंदा केवळ 371 मिलीमीटर पाऊस झाला आहे. मागील वर्षी 2020 ला या प्रकल्पावर एक हजार मि.मी. पावसाची नोंद पावसाळ्यात होती. दरम्यान गतवर्षी धरण याच काळात 109 टक्के भरलेले होते तर यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग ही होत होता. मात्र यंदा परिस्थिती तशी नाही. उजनी हळू हळू भरत आहे. भीमा खोर्‍यात पर्जन्यराजाची हजेरी दमदार नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी उजनीला अद्याप मिळालेले नाही.  यामुळे हा प्रकल्प संथगतीने भरत आहे.
घोड उपखोर्‍यातील काही धरण वगळता भीमा व मुळा मुठा उपखोरे हाऊसफुल्ल झाले आहे. उजनी धरण उपयुक्त पातळीत 80 टक्के भरले असले तरी ते क्षमतेने भरण्यास अद्यापही तीस टक्के पाण्याची म्हणजे जवळपास 15 टीएमसी पाण्याची गरज आहे. उजनी 110 टक्के भरता येते. सध्याची उजनी धरणातील आवक ही 13 हजार क्युसेकची असली तरी पाऊस थांबल्याने खडकवासलाचे पाणी कमी केल्याने आता पुणे बंडगार्डनचा विसर्ग 6 हजार क्युसेक इतका कमी झाला आहे. यामुळे येत्या काही तासानंतर दौंडची आवक ही आणखी कमी होईल.
दरम्यान उजनीला पाणी देवू शकणारी जी भीमा खोर्‍यातील धरणं आहेत ती क्षमतेने भरली आहेत. आता जर पाऊस सुरू झाला तर या प्रकल्पांमध्ये पाणीसाठवण करण्यास जागा नसल्याने ती उजनीलाच पाणी देणार आहेत. मागील दोन तीन दिवसात झालेल्या पावसातही या धरणांचे दरवाजे उघडण्यात आले होते. भीमा उपखोर्‍यातील चासकमान ,कलमोडी, वडीवळे, भामा आसखेड तसेच आंध्रा ही धरण शंभर टक्के भरली आहेत.  सध्या चासकमान प्रकल्पातून 925 क्युसेकचा विसर्ग सुरूच आहे.
याच बरोबर उजनीला थेट फायदा देणारी पवना, कासारसाई व मुळशी हे प्रकल्प ही भरलेले आहेत. मुळशी धरण 97 टक्के आहे. दरम्यान मुळा मुठा उपखोर्‍यातील खडकवासला साखळीतील वरसगाव, टेमघर, पानशेत व खडकवासला शंभर टक्के भरलेले आहेत. खडकवासला प्रकल्पामागील धरणांवर पाऊस होताच यातून पाणी सोडले जाते व ते खडकवासल्यात येथे व तेथून ते पुढे उजनीकडे सोडले जाते. मागील काही दिवसात याच धरणाने उजनीला साथ दिली आहे. मोठ्या प्रमाणात पाणी तेथून सोडले गेले आहे.
घोड उपखोर्‍यातील वडज, डिंभे हे प्रकल्प क्षमतेने भरले असले तरी अद्याप उजनीला पाणी देवू शकणारे घोड धरण पन्नास टक्केच आहे. येडगाव प्रकल्प 83 टक्के भरला आहे. माणिकडोह व पिंपळगाव जोगे ही धरण पन्नास ते साठ टक्के भरली आहेत.
नीरा खोर्‍यातील गुंजवणी, देवघर ,भाटघर व वीर हे प्रकल्प शंभर टक्के भरले असून वीरमधून गुरूवारी सकाळी 4 हजार 617 क्युसेक पाणी नीरा नदीत सोडले जात आहे. दरम्यान मागील दोन दिवसांपासून कमी जास्त प्रमाणात पाणी सोडले जात असल्याने नीरा व पुढे भीमा नदीत पाणी पातळी वाढली आहे. पंढरपूरजवळ पाण्याचा विसर्ग 11 हजार क्युसेक इतका होता. 

Header

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close