राज्य

कोरोनाचा श्री विठ्ठल मंदिराला मोठा फटका, 42 कोटी रू. उत्पन्न घटले

पंढरपूर –  येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराला कोरोनाकाळाच्या या 16 महिन्यात जवळपास 42 कोटी रूपये उत्पन्न कमी मिळाले असून या कालावधीत केवळ 6 कोटी रूपये जमा झाले आहेत. तरीही मंदिर समितीच्या वतीने विविध समाज उपयोगी योजनांसाठी सढळ हाताने निधी देण्यात आला आहे.
कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला असून तसा तो धार्मिकस्थळांना ही जास्त बसला आहे. 17 मार्च 2020 पासून कोरोनाचा काळ सुरू झाला व लॉकडाऊन पुकारले गेले. यानंतर 16 नोव्हेंबर 2020 ला मंदिर खुली झाली पण मोजक्याच भाविकांना प्रवेश व दुरून दर्शन ठेवण्यात आले होते. मात्र नंतर कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत मंदिरांचे दरवाजे बंद झाले आहेत. सध्याही अशीच स्थिती आहे.
या सोळा महिन्याच्या काळात दोन आषाढी यात्रा व अन्य सर्व यात्रा लागोपाठ रद्द झाल्याने पंढरीचे अर्थकारण थंडावले आहे तसे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे उत्पन्न ही घटले आहे. या काळात केवळ 6 कोटी रूपये मंदिराला मिळाले असून यापैकी 50 लाखाच्या देणग्या या ऑनलाइन पध्दतीने मिळाल्याचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले. कोरोनाकाळातही अनेक भाविक विठुरायाच्या चरणी देणग्या अर्पण करत आहेत. काही भाविक तर पंढरीत येवू शकत नसल्याने त्यांच्या गावी  जावून समितीच्या कर्मचार्‍यांनी त्यांचा सत्कार करून देणग्या स्वीकारल्या आहेत.
दरम्यान मंदिराचे उत्पन्न जरी कमी झाले असले तरी कोरोनाकाळात समितीच्या वतीने अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात आले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत लॉकडॉऊनमुळे येथेच अडकलेल्या जवळपास दोन हजाराहून अधिक तमिळनाडूच्या विद्यार्थ्यांना मोफत राहण्याची व भोजनाची व्यवस्था मंदिराच्यावतीने करण्यात आली होती. कोरोनाकाळात भाविक पंढरीत येत नसल्याने जे हजार ते बाराशे भिक्षेकरी उपाशी राहण्याची भीती होती त्यांना मंदिराने अन्नछत्रातून रोज दोनवेळा भोजनाची पॅकेट पोहोचवून मदत केली. केवळ मनुष्यजीवाचा विचार न करता मंदिराने बार्डीतील रानगाईंना चारा व पाण्याची सोय केली यासह शहरातील मोकाट गाईंना ही चारा पुरविला. अनेक स्वंयसेवी संस्था या काळात मदत पोहोचवू शकत नसल्याने ही जबाबदारी समितीने घेतली होती.
विठ्ठल मंदिराने याच काळात आपल्या भक्तनिवासाचे दरवारे उघडून डॉक्टरांना राहण्याची व्यवस्था केली. कोविड सेंटरला दोनशे बेड विनाशुल्क देवू केले. यासह शासकीय रूग्णालयात हाय फ्लो ऑक्सिजन मशीनसाठी दहा लाखांची मदत केली. पीपीई किट यासह मास्क, सॅनिटायझर देवू केले तर पन्नास कमांडोजचा पगार स्वतः देवून त्यांना पोलिसांच्या मदतीला पाठविले. याच काळात मंदिर समितीने अनेक कामे मंदिरात पूर्ण करून घेतली आहेत. मूर्तींवरील लेप असो की परिवार देवतांच्या मंदिराचे सुशोभिकरण असेल अथवा मंदिरातील तेहत्तीस कोटी देवतांच्या संवर्धनासाठीचा उपक्रमाचा यात समावेश आहे. यासह अनेक उपक्रम मंदिर समितीने राबविले आहेत.यासाठी सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासह सर्व सदस्य तसेच कार्यकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व समिती कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले आहेत.  

Header

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close