श्री विठ्ठल मंदिराला मूळ पुरातन रूपात आणण्याच्या योजनेस मुख्यमंत्र्यांकडून भरीव मदतीची अपेक्षा
पंढरपूर – येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराची उभारणी अंदाजे 700 वर्षापूर्वी झाली असावी असा अंदाज असून त्यावेळीप्रमाणे मूळ रूप देण्याचा प्रयत्न सध्या मंदिरे समितीच्या वतीने सुरू असून यासाठी किमान 50 ते 55 कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. कोरोनाकाळात मंदिराचे घटलेले उत्पन्न पाहता शासनाकडून यास काही निधी मिळण्याची शक्यता असून आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी येणारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यास सहकार्य करतील अशी सर्वांना अपेक्षा आहे.
याचा आराखडा तयार करण्यात आला असून गेले काही दिवस यावर अभ्यास सुरू आहे. मंदिर समितीच्या बैठकांमध्ये यावर विचारविनिमय झाला आहे. याच बरोबर विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे या देखील हा आराखडा राबविण्याबाबत अनुकूल असून त्यांचा उद्या 14 जुलै रोजी पंढरपूर दौरा होत असून त्या पुरातत्व विभागाचे अधिकारी व मंदिर समितीबरोबर बैठक घेवून चर्चा करणार आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी 19 जुलै दशमीला पंढरपूरला येत असून या दरम्यान याबाबत काही घोषणा होणार का? याकडे सार्यांचे लक्ष आहे.
आराखड्याबाबत मंदिर समितीची मंगळवारी पुरातत्व विभागाच्या अधिकार्यांसमवेत आणखी एक बैठक झाली आहे. यास पुरातत्व विभागाचे आर्किटेक्चर प्रदीप देशपांडे हे उपस्थित होते. हा जो आराखडा तयार करण्यात आला आहे तो जवळपास 55 कोटी रूपयांच्या घरात जात आहे. यात संत नामेदव पायरी येथील काही कामाचा समावेश करण्यात आला आहे. याचे पुन्हा उद्या बुधवारी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांच्यासमोर सादरीकरण करण्यात येणार आहे. दरम्यान आजच्या बैठकीस मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासह सदस्य, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी उपस्थित होते.
यात रासायनिक प्रक्रियेने विठ्ठल मंदिराचे मजबुतीकरण करण्यासाठी साडे आठ कोटी रुपये एवढा खर्च होणार असून मंदिराच्या मजबुतीकरणाला सुमारे साडे चौदा कोटी खर्च अपेक्षित आहे. यासह विद्युतीकरण, अग्निशमन यंत्रणा, सीसीटीव्ही यासाठी साडे सहा कोटी खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे . याशिवाय काही वास्तू नव्याने उभ्या करण्यासाठी साडे अकरा कोटी रुपयांचा खर्च होईल.