विजयदादांनी घेतली एकनाथ शिंदे यांची भेट तर गुरूवारी प्रवीण दरेकर अकलूज दौर्यावर
अकलूज – राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अकलूज – माळेवाडी ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत तर नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रूपांतर करण्यासाठी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी सकारात्मक चर्चा झाल्याचे उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी भेट घेतली व त्यांचा सन्मान केला. यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, अकलूजचे उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, नातेपुतेचे उपसरपंच अतुल पाटील, माळेवाडीचे सरपंच जालिंदर फुले, बाळासाहेब फुले, किसन बनकर उपस्थित होते.
मोहिते पाटील म्हणाले, अकलूज – माळेवाडी व नातेपुते ग्रामपंचायत यांच्यावतीने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन नगरपरिषद व नगरपंचायतमध्ये रुपांतर होण्याबाबत आग्रह करण्यात आला आहे. शिंदे यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे सांगितले. सध्या या तीनही ग्रामपंचायतीबाबत उच्च न्यायालयात खटला दाखल करण्यात आला असून 17 जुलै रोजी निर्णय अपेक्षित आहे. अकलूज – माळेवाडी व नातेपुतेबाबत आता फार वेळ वाट पहावी लागणार नाही असेही ते म्हणाले.
प्रवीण दरेकर अकलूज दौर्यावर
दरम्यान राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे अकलूज – माळेवाडी व नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपरिषद व नगरपंचायतमध्ये रूपांतर करण्याच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व ग्रामस्थांच्या भावना जाणून घेण्यासाठी गुरुवार15 जुलै रोजी अकलूज दौर्यावर येत आहेत. ते प्रांत कार्यालयासमोर सुरु असलेल्या उपोषणकर्त्यांची भेट घेणार आहेत, असे शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले. गेल्या 22 दिवसात 95 सेवाभावी संस्था व संघटनांनी या साखळी उपोषणाला पाठिंबा दिला असल्याचे ते म्हणाले.