36 टक्के पंढरपूरकरांनी पहिला डोस ही घेतलेला नाही ,वर्षाअखेरीस 30 व 31 डिसेंबरला शहरात महालसीकरण मोहीम
पंढरपूर – शहरातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी तसेच कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता लसीकरण वेगाने होण्यासाठी पंढरपूरमध्ये एकाचे वेळी 20 ठिकाणी 30 व 31 डिसेंबर 2021 रोजी महालसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी दिली. शहरातील 36 लोकांनी अद्याप कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेला नाही.
लसीकरणामुळे पंढरीत कोरोनाचे रूग्ण कमी झाले असले तरी शहरातील 36 टक्के नागरिकांनी अद्याप पहिला डोस घेतला नाही. त्यांनी त्वरित तो घ्यावा. तसेच 64 टक्के नागरिकांनी दुसरा लसीचा डोस घ्यावा यासाठी हे अभियान असून संभाव्य तिसर्या लाटेचा धोका लक्षात घेता शहरातील 18 वर्षापुढील नागरिकांनी स्वत:च्या सुरक्षितेसाठी लस घ्यावी, असे आवाहनही मुख्याधिकारी माळी यांनी केले आहे.
या महालसीकरण मोहिमेतंर्गत शहरातील 65 एकर, लखुबाई पटांगण अंगणवाडी, साठेनगर अंगणवाडी, अनिलनगर भगवती मंदिर, सेंट्रल नाका अंगणवाडी, नगरपालिका दवाखाना कोळी गल्ली, लोकमान्य विद्यालय, कालिका देवी मंदिर, काळा मारुती दवाखाना, बुद्ध विहार डॉ.आंबेडकर नगर, बडवेचर झोपडपट्टी अंगणवाडी, बनसोडे मळा अंगणवाडी, गणेशनगर दत्त मंदिर, माळी वस्ती अंगणवाडी टाकळी रोड, आय.एम.ए हॉल, मनीषा नगर विठ्ठल मंदिर, मोहसिन विद्यालय अंगणवाडी, विसावा मंदिर इसबावी, नागरी आरोग्य केंद्र नंबर- 2 तसेच 7 नंबर शाळा या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु राहणार आहेत.
महालसीकरण मोहिमेतंर्गत लसिकरणासाठी 20 टोचक, 40 आशा वर्कर व अंगणवाडी सेविका, 4 सुपरवायझर, 20 डाटा एन्ट्री ऑपरेटर कार्यरत राहणार असून संबधित लसीकरण केंद्र सकाळी 8.00 ते 5.00 यावेळेत सुरु राहणार आहेत. लसीकरणासाठी लस मुबलक प्रमाणात असू नागरिकांनी लसीबाबत कोणताही गैरसमज न ठेवता लस घ्यावी असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी केले आहे.