विशेष

शुभवार्ता : २०२१ संपताना उजनीत १०९ % टक्के पाणीसाठा

पंढरपूर –  सरते 2021 हे वर्ष उजनी धरणासाठी लकी ठरले असून यंदाही हा प्रकल्प क्षमतेने भरला असून विशेष म्हणजे वर्ष संपताना या धरणात 109 टक्के म्हणजे क्षमतेने पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे 2022 चा उन्हाळा सुसह्य होणार आहे.
2021 चा पावसाळा सुरू होताना 2 जून रोजी उजनी धरणाची पाणीस्थिती ही नाजूक होती. याच्या उपयुक्त पातळीत 22.42 टक्के जलसाठा वापरला गेला होता. हे पाहता धरण उपयुक्त पातळीत येण्यास 12 टीएमसी पाण्याची गरज होती. हा प्रकल्प हळूहळू म्हणजे 22 जुलै रोजी उपयुक्त पातळीत भरण्यास प्रारंभ झाला. यानंतरच्या काळात पावसाने भीमा खोर्‍यात ओढ दिल्याने उजनी शंभर टक्के भरण्यासाठी 6 ऑक्टोंबरची वाट पाहावी होती. यानंतर धरण क्षमतेने म्हणजे 110 टक्के भरले गेले व उजनीतून भीमेत पाणी ही सोडले गेले होते.
मागील वर्षी 2020 प्रमाणे यंदाही अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने उजनी धरणाला याचा फायदा झाला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस व डिसेंबरच्या सुरूवातीला अवकाळी पावसाने धरणावर तसेच भीमा खोर्‍यात हजेरी लावली व उजनी धरणात जवळपास सहा टक्के जलसाठा वाढला व आता 2021 संपताना हे धरण 109.45 टक्के अशा स्थितीत आहे.
उजनी धरणात क्षमतेने पाणीसाठा असल्याने सोलापूर जिल्ह्यासह जलाशयकाठावरील योजनांची व शेतीला आता मुबलक पाणी पुढील पावसाळ्यापर्यंत मिळू शकते. सोलापूर जिल्ह्यातही नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली असल्याने उजनीतून शेतीसाठी पाण्याची मागणी झाली नाही. आता नवीन वर्षात म्हणजेच 2022 च्या जानेवारी रब्बीसाठी पाणी सोडले जावू शकते.
2021 च्या पावसाळा हंगामात उजनी धरणावर एकूण 646 मिलीमीटर पाऊस पडला असून तो 2020 च्या तुलनेत कमी असला तरी समाधानकारक असा आहे. डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस जो तीन दिवस उजनीवर पडला याची नोंद जवळपास 90 मि.मी. इतकी झाली आहे.  30 डिसेंबर रोजी उजनी धरणात एकूण पाणीसाठा हा 122.29 टीएमसी इतका आहे. यापैकी उपयुक्त जलसाठा हा 58.64 टीएमसीचा आहे.
उजनी धरण क्षमतेने भरले असल्याने येणार्‍या उन्हाळा हंगामात पिण्यासाठी भीमानदीत ही योग्य प्रमाणात पाणी सोडता येणे शक्य आहे. या धरणावर सोलापूर महापालिकेसह पंढरपूर , मंगळवेढा, सांगोला नगरपरिषदांसह अनेक गावांच्या पाणी योजना अवलंबून आहेत. तसेच अनेक उपसा सिंचन योजनांसाठी उजनीचे पाणी वापरले जाते व यातून शेती फुलते. याच धरणामुळे सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक जास्त साखर कारखाने निघाले असून राज्याच्या तुलनेत एकूण 18 टक्के साखर एकट्या सोलापूर जिल्ह्यात तयार होते.

Header

Related Articles

Back to top button
Close
Close