Uncategorized

पोटनिवडणुकीच्या विजयाने भाजपाचे “समाधान” करणारे वर्ष २०२१


पंढरपूर – सरते 2021 वर्ष हे राजकीयदृष्ट्या पंढरपूर मतदारसंघात धक्कादायक निकाल देणारे ठरले असून येथे प्रथमच भारतीय जनता पक्षाला विधानसभा पोटनिवडणुकीत यश मिळाले आहे. तर राज्यात महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असणार्‍या राष्ट्रवादीला पराभवाचा सामना करावा लागला. या निकालानंतर पंढरपूरची चर्चा राज्यभर होत होती.
पंढरपूर हा भाग परंपरेने काँग्रेसी विचारसरणीच्या पाठीशी राहिलेला आजवर दिसून आले आहे. 2014 व 2019 देशात मोदी यांची लाट असतानाही भाजपाला या विधानसभा मतदारसंघात यश मिळाले नव्हते. मात्र 2020 ला तत्कालीन राष्ट्रवादी पक्षाचे आमदार भारत भालके यांचे निधन झाले व 2021 च्या एप्रिल महिन्यात पोटनिवडणूक जाहीर झाली. याचा निकाल 2 मे रोजी घोषित झाला. या निवडणुकीत भालके कुटुंबाप्रती मतदारांमध्ये सहानभूतीची लाट असतानाही भाजपाने परिचारक व आवताडे गटांना एकत्र आणण्याचा केलेला प्रयोग यशस्वी ठरला व राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांना पराभूत व्हावे लागले. येथे भाजपाचे समाधान आवताडे विजयी झाले.
2021 हे वर्ष जसे कोरोनाच्या संसर्गाने गाजले तसेच ते राजकीयदृष्ट्याही पंढरपूरसाठी महत्वाचे ठरले आहे. पंढरपूर व मंगळवेढा या दोन तालुक्यांच्या या मतदारसंघाचा पोटनिवडणुकीचा निकाल सत्ताधारी तीन पक्षांच्या महाविकास आघाडीसाठी अत्यंत धक्कादायक मानला गेला. यामुळे भाजपाचे राज्यात 105 वरून 106 आमदार झाले आहेत.
या सरत्या वर्षात 2021 च्या अखेरीस पंढरपूरचे असणारे सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील आमदार प्रशांत परिचारक यांची सहा वर्षाची मुदत संपत आहे. 1 जानेवारी 2022 पर्यंत त्यांच्या विधानपरिषद आमदारकीची मुदत आहे. येथील विधानपरिषद जागेची निवडणूक पात्र मतदारसंख्या 75 टक्क्यांपेक्षा कमी असल्याने पुढे ढकलण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. जर ही निवडणूक वेळेत झाली असती तर परिचारक यांना भाजपाने पुन्हा उमेदवारी दिली असती हे निश्‍चित मानले जात होते. मात्र आता काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
राजकीयदृष्ट्या 2021 हे वर्ष पंढरपूर तालुक्यासाठी अनेक घडामोडी घडविणारे ठरले आहे. येथे 2014 पासून एकमेकाविरोधात लढणारे परिचारक व आमदार समाधान आवताडे हे दोन गट भाजपाच्या झेंड्याखाली एकत्र आले आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँगे्रस पक्षात पोटनिवडणुकीनंतर सुंदोपसुंदी दिसत आहे. गटबाजीचा कहर झाला आहे. तालुक्यातील शेतकर्‍यांचा राजवाडा मानला जात असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना यंदा सुरू होवू शकला नाही. तर अध्यक्ष भगीरथ भालके हे देखील सभासदांच्या फारसे संपर्कात नाहीत. पराभवानंतर येथे राष्ट्रवादी पक्षात गटतटाचे राजकारण आहे. 2021 मध्ये पोटनिवडणूक काळात कल्याणराव काळे भाजपाला सोडून राष्ट्रवादीत सामील झाले आहेत. तर दुसरीकडे धाराशीव कारखान्याचे अध्यक्ष तथा डीव्हीपी उद्योग समूहाचे प्रमुख अभिजित पाटील हे सक्रिय राजकारणात उतरण्याच्या तयारीत आहेत.
वास्तविक पाहता 2021 च्या अखेरीस नगरपरिषद निवडणुका होणे अपेक्षित होते. मात्र अद्याप निर्णय झालेला नाही. वॉर्ड रचना तयार असली तरी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तसेच ओमायक्रानचे संकट पाहता या निवडणुका आता कधी होणार? याची निश्‍चिती नाही. यामुळे नगरसेवकपदासाठी इच्छुकांचा वर्ष संपताना हिरमोड झाल्याचे दिसत आहे.

Header

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close