Uncategorized

अभिमानास्पद : शेतीमालाला योग्य किंमत मिळण्यासाठी सोलापूर विद्यापीठाकडून विशेष सॉफ्टवेअरची निर्मिती

सोलापूर, दि. 31- संपूर्ण देशभरात शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळत नाही, यामुळे ओरड सुरू असते. शेतकऱ्यांच्या मालाला आधारभूत किंमत मिळावी आणि त्यांना नफा मिळावा, यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून विशेष सॉफ्टवेअरची निर्मिती करण्यात आली असून त्याला भारत सरकारकडून पेटंट प्राप्त झाल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.

‘ऍन इंटिलीजेंट सिस्टीम अँड ए मेथड फॉर सिस्टिमेटिक डिस्ट्रीब्यूशन ऑफ अग्रिकल्चर गुड्स’ असे या सॉफ्टवेअरचे नाव असून त्याला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून पेटंट प्राप्त झाला आहे. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस आणि अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश व्हनकडे यांना यासंबंधी पेटंट जाहीर झाला आहे. शेतीमालाच्या तसेच विविध कृषी वस्तूंच्या किंमत निर्धारणसंबंधी आणि वितरणासंबंधी हे सॉफ्टवेअर उपयोगी ठरणार आहे. कोणत्या वेळी कोणते पीक घ्यावे, त्याचबरोबर विविध शेती मालाला कोणत्या कालावधीमध्ये भाव प्राप्त होतो तसेच कोणत्या विभागांमध्ये त्या पिकाला दर मिळतो हे विद्यापीठाकडून तयार करण्यात आलेले सॉफ्टवेअर मार्गदर्शन करू शकते.

विभागनिहाय बाजारमूल्य आणि माहिती या विशेष सॉफ्टवेअरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळण्यास मदत होणार आहे. तसेच त्या माध्यमातून जिल्हानिहाय विक्री व वितरण व्यवस्था देखील सॉफ्टवेअरच्या माध्यमातून योग्य पद्धतीने करता येणार आहे. जेणेकरून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळून त्यांचा उत्पन्न वाढण्यासाठी या विशेष सॉफ्टवेअरची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचा शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होईल, असा विश्वास कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

विद्यापीठाकडून शेतीमालाच्या किफायतशीर किमतीसाठी तयार करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरचा शेतकऱ्यांना व शासनाला फायदा होण्यासाठी एक प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येणार येणार असल्याचे अर्थशास्त्र विभागाचे डॉ. प्रकाश व्हनकडे यांनी सांगितले.

Header

Related Articles

Back to top button
Close
Close