विशेष

हैद्राबाद बुलेट ट्रेनच्या मार्गावरून प. महाराष्ट्र व मराठवाड्यात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता


पंढरपूर – पुणे व सोलापूर जिल्ह्यातून धावण्याचा मार्ग असणार्‍या मुंबई ते हैद्राबाद बुलेट ट्रेनचे सर्व्हेक्षण वेगाने सुरू असून याबाबत या भागात उत्सुकता असतानाच आता राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ही बुलेट ट्रेन मराठवाड्यातून नेण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याने सोलापूर जिल्ह्यातून नाराजी व्यक्त केली जात आहे. यामुळे पुन्हा एकदा पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.


देशात राष्ट्रीय द्रुतगती रेल्वे महामंडळाच्या अंतर्गत मुंबई- अहमदाबाद, मुंबई- नागपूर , नवी दिल्ली- वाराणसी व मुंबई ते हैद्राबाद बुलेट ट्रेन प्रकल्प राबविण्याची तयारी सुरू आहे. मुंंबई – हैद्राबाद बुलेट ट्रेन ही  महाराष्ट्र , कर्नाटक व तेलंगाणातील अकरा रेल्वे स्टेशन असणारी व 350 किलोमीटर प्रतितास वेगाने धावणारी ट्रेन असणार आहे. यासाठी मुंबई, नवी मुंबई, लोणावळा, पुणे, दौंड, अकलूज, पंढरपूर, सोलापूर, कलबुर्गी, जहीराबाद व हैद्राबाद असा मार्ग ठरविण्यात आला आहे. 711 किलोमीटर या मार्गाचे हवाई सर्व्हेक्षण देखील पूर्ण करण्यात आले आहे. मोनार्च सर्व्हेअर्सने हे काम करत आहे. सध्या मुंबई ते हैदराबाद प्रवासासाठी 12 ते 14 तास लागतात मात्र बुलेट ट्रेन हे अंतर साडेतीन तासात पूर्ण करू शकते.


आता या मार्गाचे सर्व्हेक्षण होत असताना काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री व सध्याच्या महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अशोक चव्हाण यांनी मुंबई- हैद्राबाद बुलेट ट्रेन ही मराठवाड्यातून नेण्याची मागणी केली आहे. मुंबई- औरंगाबाद , जालना, नांदेड मार्गही गाडी धावावी असा आग्रह त्यांनी मुख्यमंत्री  उध्दव ठाकरे यांच्याकडे धरला आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवावा असे चव्हाण यांचे म्हणणे आहे. या मागणीमुळे पश्‍चिम महाराष्ट्रात मात्र नाराजीचा सूर उमटू लागला आहे. अशोक चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार ,सध्या रेल्वेचा हैद्राबाद मार्ग याच भागातून म्हणजे मराठवाड्यातून जातो. या शेजारून बुलेट ट्रेनचा मार्ग तयार होवू शकतो. यासाठी जास्त भूसंपादन ही गरजेचे नाही व यामुळे मराठवाड्याचा विकास होवू शकतो.


भारतीय जनता पक्षाचे सोलापूरचे माजी जिल्हाध्यक्ष काशीनाथ थिटे यांनी याबाबत प्रसिध्दीस पत्रक दिले असून यात त्यांनी बुलेट ट्रेनचा मार्ग बदलण्यास विरोध केला आहे. याचे सर्व्हेक्षणही पूर्ण होत आले असताना अशी मागणी करणे अयोग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्य सरकारमधील मंत्रीच विकासकामांना विरोध करून प्रादेशिक वाद निर्माण करत असल्याचा आरोप थिटे यांनी केला आहे. काहीच  दिवसांपूर्वी उजनीच्या पाण्यावरून सोलापूर व इंदापूर (पुणे) असा वाद रंगला होता. यात जनरेटा पाहून शासनाल नमते घ्यावे लागले होते. जर बुलेट ट्रेनचा मार्ग बदलण्याचा विचार झाला तर आम्ही त्यास विरोध करू, असा इशारा काशीनाथ थिटे यांनी दिला आहे. जर सरकारला मराठवाड्यातून वेगळी बुलेट ट्रेन न्यायची असेल तर आम्ही त्यांचे स्वागत करू असे या प्रसिध्दीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.   

Header

Related Articles

Back to top button
Close
Close