कार्तिकी यात्रा भरविण्यास जिल्हाधिकारी यांनी दिली परवानगी, २० महिन्यांनी विठुरायाची पंढरी वारकऱ्यांनी गजबजणार
पंढरपूर – कोरोना महामारीमुळे जवळपास २० महिने पंढरपूरमध्ये यात्रा भरविण्यावर निर्बंध होते. मात्र आता संसर्ग कमी झाल्याने सारे व्यवहार सुरळीत होत असताना शासनाने वारकऱ्यांची मागणी पूर्ण करत यंदाची कार्तिकी यात्रा भरविण्यास मान्यता दिली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मिलिंद शंभरकर यांनी कोरोना विषयक सर्व नियमांचे पालन करत यात्रा भरविण्यास मान्यता दिली आहे.
याबाबत सविस्तर आदेश त्यांनी पारित केला असून यात पंढरपूर प्रांताधिकारी यांनी सादर केलेल्या प्रस्तावास परवानगी दिली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीनेही कार्तिकी यात्रा भरविण्यास मान्यता देण्याची मागणी केली होती. कोरोनामुळे मार्च २०२० पासून एकही यात्रा पंढरपूरमध्ये भरलेली नाही. आता ७ नोव्हेंबर पासून सुरु होत असलेल्या कार्तिकीस परवानगी मिळाली आहे. यामुळे वारकरी संप्रदाय व पंढरपूर मधील व्यावसायिक यांच्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. यात्रा भरत नसल्याने पंढरीचे अर्थकारण ठप्प होते.
जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार मंदिरात भाविकांचे दर्शन, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणारी एकादशीची महापूजा, एकादशीचा रथोत्सव, नैवेद्य, श्री विठ्ठलाच्या पादुकांची मिरवणूक, महाव्दार काला, पंढरपूरला येणाऱ्या दिंड्यांचे नियोजन, मठांमध्ये उतरण्याऱ्या भाविकांची नियमावली, वाळवंटातील परंपरा, आरोग्य, स्वच्छता व पाणी पुरवठा व्यवस्था यासह विविध बाबींबाबत सविस्तर उपाययोजना कक्रण्याच्या सूचना दिल्या आहेत.
“कार्तिकी यात्रा भरविण्यास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मान्यता दिली असून त्यांचे आम्ही जाहीर आभार मानतो.”
सत्यविजय मोहोळकर
अध्यक्ष, व्यापारी महासंघ पंढरपूर.