उजनीतून कॅनॉल वगळून अन्य योजनांसाठी पाणी सोडण्यात प्रारंभ, धरण @ 58.51%
पंढरपूर- उजनी धरणातून भीमा- सीना जोड कालवा, सीना- माढा सिंचन योजना व दहीगाव उपसा सिंचन योजनेद्वारे शेतीसाठी खरीप हंगामातील पहिले आवर्तन सुरू करण्यात आले असल्याची माहिती जलसंपदा विभाग, सोलापूरचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली आहे.
धरणात सध्या 58.51टक्के पाणीसाठा झालेला आहे. तसेच दौंड येथून उजनीत येणारा पाण्याचा विसर्ग मंदावला असल्यामुळे व धरणातील पाणीसाठा 111 टक्क्यापर्यंत आणणे आवश्यक असल्याने सध्या कालव्यातून पाणी सोडता येत नाही. जर कालव्यांमधून पाणी सोडायचे असेल तर अडीच ते तीन हजार क्युसेक ते सोडावे लागते व ते सध्या तरी शक्य नाही. धरणात 85 ते 90 टक्के पाणी साठा झाल्यानंतर कॅनॉलमधून सुरू करण्याचा विचार असल्याचे साळे यांनी सांगितले.
दरम्यान धरणात 30 टक्केपेक्षा जास्त पाणीसाठा झाल्यानंतर आमदारद्वय बबनदादा शिंदे व आमदार संजय शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे कालवा, बोगदा, सीना माढा व दहीगाव सिंचन योजनेतून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी केली होती. यास यश आले असून 5 ऑगस्टपासून बोगद्यातून सीना नदीत, सीना- माढा सिंचन योजना आणि दहिगाव उपसा सिंचन योजनेतून शेतीसाठी पाणी सोडण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.
भीमा -सीना जोड कालव्यातून सीना नदीत प्रथम 150 क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. यामध्ये शुक्रवार सायंकाळपर्यंत वाढ होऊन ते 700 ते 800 क्युसेकपर्यंत वाढवून पाणी सोडण्यात येणार आहे. सीना माढा सिंचन योजनेच्या चार पंपाद्वारे प्रथम 140 क्युसेक व नंतर दोन दिवसांनी सहा पंपाद्वारे 220 क्युसेक पाणी सुरू होणार आहे. दहिगाव उपसा सिंचन योजनेतून 80 क्युसेकने पाणी आवर्तन सुरू झाले आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यात पावसाने ओढ दिली असून खरिपातील या आवर्तनामुळे शेतकरी आनंद व्यक्त करत आहे.
सीना माढा सिंचन योजनेच्या मेन रायझिंग- झोन पाइपलाइनला अनेक ठिकाणी गळती असल्याने मुख्य कालव्यात पाण्याचा डिस्चार्ज कमी मिळत आहे. ते लिकेज तातडीने काढण्यात यावे व पूर्ण क्षमतेने पाणी मुख्य कालव्यात घ्यावे यासाठी प्रयत्न आवश्यक आहे.
उजनी धरणात सध्या 58.51 टक्के पाणीसाठा झालेला असून एकूण साठा 95 टीएमसी झालेला आहे. दौंड येथून येणारा पाण्याचा विसर्ग कमी होत असून सध्या तो 8 हजार 398 क्युसेक आहे. पुणे जिल्हा व उजनी धरण कार्यक्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण कमी झाले असल्यामुळे धरणात येणारा दौंड येथील पाणी विसर्ग कमी होत आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी संथ गतीने वाढत आहे.
पाणी मागणीचे अर्ज भरावे
सोलापूर जिल्ह्यात सध्या पावसाचे प्रमाण कमी आहे. उजनी धरणाची वाटचाल संथ गतीने का होईना पण सुरू आहे. सध्या बोगदा व दोन सिंचन योजनेतून खरिपाचे पहिले आवर्तन सुरू केले आहे. शेतकर्यांनी आता पाटबंधारे खात्याकडे तातडीने पाणी मागणीचे अर्ज सादर करावे.
धीरज साळे, अधीक्षक अभियंता