राज्य

सीएम ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये उजनीपाठोपाठ अकलूज-नातेपुते प्रश्‍नीही राष्ट्रवादीला धक्का देत जनहिताचा निर्णय

 

पंढरपूर – उजनीत येणारे पुणे जिल्ह्यातील सांडपाण्यापैकी पाच टीएमसी पाणी धरणातून उचलून इंदापूर तालुक्याला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र सोलापूरचा जनरेटा पाहता काही दिवसात हा निर्णय राज्य सरकारने बदलला होता. त्यावेळ मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीच याबाबत हस्तक्षेप केल्याची चर्चा होती. तर आता अकलूज-माळेवाडी नगरपरिषद व नातेपुते नगरपंचायत निर्मितीसाठी 43 दिवस आंदोलन करणार्‍या नागरिकांना दिलासा देत शिवसेनेकडे विभाग असणार्‍या नगरविकास मंत्रालयाने याबाबतचे अध्यादेश काढले. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी यासाठी आग्रह धरला होता. यामुळे मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचे पाहावयास मिळत आहे.
अकलूज व नातेपुतेचे नागरिक धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेले 43 दिवस विविध आंदोलन करत होते. यामुळे सहाजिकच जिल्ह्यात राज्य सरकार विरोधात वातावरण ही निर्माण होत चालले होते. दोन वर्षापूर्वी मान्यता मिळालेल्या नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निर्मितीला जाणूनबुजून थकविल्याचे चित्र स्पष्ट दिसत होते. यात राष्ट्रवादी विरूध्द मोहिते पाटील असा संघर्ष असल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र महाविकास आघाडीत नगरविकास विभाग हा शिवसेनेकडे असल्याने या खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. बैठका झाल्या. तत्पूर्वी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनीही शिंदे यांनी भेट घेवून वस्तुस्थिती सांगितली होती. हा प्रश्‍न उच्च न्यायालयात पोहोचला होता. तेथे लवकरच निर्णय अपेक्षित होता. याच बरोबर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची मोहिते पाटील यांनी भेट घेतली होती.
अखेर 3 ऑगस्ट रोजी नगरविकास विभागाने अकलूज व माळेवाडी नगरपरिषद व नातेपुते नगरपंचायत निर्मितीचा अध्यादेश जारी केला. यामुळे 43 दिवसांचे आंदोलन आता संपले आहे. यात शिवसेनेने मदत केल्याचे दिसत आहे. राज्य प्रमुखाच्या भूमिकेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी उचलेले हे पाऊल स्वागतार्ह मानले जात आहे. कारण सरकार चालविताना सहकारी पक्षांची भूमिका महत्वाची ठरत असली तरी सरकारच्या व मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला तडा जावून विनाकारण लोकहिताचे निर्णय थांबविले तर शिवसेनेला याची किंमत जास्त मोजावी  लागली असती. कारण हा विभाग याच पक्षाकडे आणि मुख्यमंत्रिपदही.
यापूर्वी उजनीच्या पाण्यावरूनच असाच वाद रंगला होता. उजनीत येणारे पुणे भागातील सांडपाण्यापैकी पाच टीएमसी इंदापूरला नेण्याची योजना आखण्यात आली व यास मुख्यमंत्र्यांची परवानगी असल्याचे सतत सांगितले गेले. मात्र सोलापूर जिल्ह्यातून इतका विरोध वाढला की शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी तर यावरूनच राष्ट्रवादीच्या सर्वोच्य नेत्यांवर उघडपणे माध्यमांमधून कडक टीका केली होती. तेंव्हाही हा प्रश्‍न मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतला व यानंतर काहीच दिवसात तो रद्द करण्यात आला होता. याबाबत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आदेश काढले होते. हा विभाग राष्ट्रवादीकडेच आहे. मात्र मुख्यमंत्र्यांचे लक्ष या प्रश्‍नी होते. येथील शिवसेनेचे पदाधिकारी हे ठाकरे यांच्याबरोबर अनेक वर्षांपासून काम करत आहेत व त्यांची पक्षीय बांधणीसाठी सतत ऑनलाइन अथवा प्रत्यक्ष चर्चा होत असते.
राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने अकलूज ही स्वतंत्र नगरपालिका म्हणून गणली जाईल यासाठी योग्य ते आदेश काढले आहेत.आणि हे आदेश काढण्यापूर्वी काल नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे उपनेते विश्‍वनाथ नेरुरकर यांच्यासह सोलापूर शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे,धनंजय डिकोळे, पुरुषोत्त्तम बरडे, गणेश वानकर,उपजिल्हा प्रमुख दत्ता पवार,माळशिरस तालुका प्रमुख नामदेव वाघमारे,युवासेना जिल्हाधिकारी स्वप्नील वाघमारे यांच्या उपस्थितीत एक विशेष बैठक घेऊन अकलूज नगरपालिका निर्मिती बाबत चर्चा केली आणि मंगळवारी याबाबतचे आदेश काढले आहेत अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे आणि धनंजय डिकोळे यांनी दिली आहे.            
याबाबत अधिक माहिती देताना शिंदे, डिकोळे यांनी अकलूज  नगरपालिका निर्मितीबाबत सुरु असलेल्या घडामोडीबाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्याचे सांगत हा निर्णय घेणे कसे गरजेचे आहे यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने एक निवेदन शिंदे यांना दिल्याचे सांगत अकलूज आणि नातेपुते येथील जनतेच्या भावना या निवेदनातून स्पष्ट करण्यात आल्या होत्या. अकलूज आणि नातेपुते येथील जनभावनेचा आदर राज्य सरकारने नगरपालिका निर्मितीचा आदेश दिल्याची माहिती शिवसेना माळशिरस तालुकाप्रमुख नामदेव वाघमारे यांनी दिली आहे. तर हा आदेश निघाल्याचे समजताच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिह मोहिते पाटील व अकलूजचे माजी सरपंच धैर्यशील मोहिते पाटील यांनी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले अशी माहिती यावेळी अकलूजचे ज्येष्ठ शिवसैनिक प्रमोद अण्णा कुलकर्णी यांनी दिली.

Header

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close