अकलूज नगरपरिषद व नातेपुते नगर पंचायतीला शासनाची मंजुरी, हा तर नागरिकांच्या एकीचा विजय – धैर्यशील मोहिते पाटील

अकलूज – गत ४३ दिवसांपासून अकलूज-माळेवाडी व नातेपुते नागरिकांच्या सुरु असलेल्या लढ्याला आज यश मिळाले. शासनाने दिलेल्या मुदतीला चार दिवस बाकी असताना आज नगर विकास गात्याने अकलूज-माळेवाडी नगर परिषद व नातेपुते नगर पंचायत गठीत केल्याचा आदेश काढला. यावर प्रतिक्रिया देताना धैर्यशील मोहीते पाटील म्हणाले हा तर नागरिकांच्या एकीचा विजय आहे असे सांगितले.
गत १८ जून रोजी अकलूज-माळेवाडी व नातेपुतेच्या नागरिकांनी तहसील कार्यालय माळशिरस येथे एक दिवसीय लाक्षणीक उपोषण करुन आंदोलनाचे रणशिंग फुंकले होते. त्यानंतर दि. २२ जुन पासून अकलूज येथिल प्रांत कार्यालयासमोर तीनही गावच्या नागरिकांनी नगर परिषद व नगर पंचायतीची मंजचरी मिळेपर्यंत उपोषण सुरु केले होते.
या उपोषणाला चित्राताई वाघ, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. राम सातपुते, आ. प्रशांत परिचारक, श्रीकांत देशमुख यांनी भेट देऊन पाठिंबा दिला होता. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धैर्यशील मोहिते पाटील, उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, माळेवाडी नातेपुतेचे सरपंच, उपसरपंच, बाबाराजे देशमुख, मामासाहेब पांढरे व इतर नागरिकांचे शिष्टमंडळ नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल भगतसिंह कोशारी यांना जाऊन भेटले होते. तत्पूर्वी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. उपोषण व आंदोलन काळात यावर दोनदा सुनावणी झाली. पहिल्या सुनावनीत शासनाने आपली बाजू मांडली नसल्याने त्यांना न्यायालयाने बाजू मांडण्याचा आदेश दिला, दुसऱ्या सुनावणीत शासनाने तीन आठवङ्यांचा वेळ मागून घेतला. त्यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव उपोषणकर्त्यांच्या भेटीला आले व उपोषण सोडण्याची विनंती केली. पण उपोषण कर्ते मंजुरी मिळण्यावरती ठाम राहिले.
उपोषण काळात शासनाचा दहावा घालण्यात आला. जागरण गोंधळ करण्यात आला. उपोषणास तालुक्यातील सुमारे १६५ संघटनांनी पाठिंबा दिला. तर गत ४३ दिवसांमध्ये सुमारे दहा हजार वीस लोकांनी आंदोलनात भाग घेतला.
शिवसेना, भाजपा व काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी या आंदोलनाला आपला पाठींबा दिला. यावेळी शिवसेना नेते नामदेव वाघमारे, दत्ताआबा पवार, आण्णा कुलकर्णी, धनंजय डिकोळे यांचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी आभार मानले.
यावेळी संपूर्ण अकलूज शहरात मिठाई वाटण्यात आली. फटाके फोडण्यात आले. व डिजेच्या तालावर नाचून नागरिकांनी आपला आनंद व्यक्त केला.
सामूहिक प्रयत्नांना आलेले हे यश….
सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या संदर्भातील सर्व पूर्तता झाली होती. देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली होती. त्यानंतर सरकार बदलले व हा प्रश्न प्रलंबित राहिला होता. तो आज निकाली निघाला आहे .मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे मनापासून आभार मानतो. व या निर्णयाचा पाठपुरावा करण्यासाठी अकलूज, माळेवाडी, नातेपुते येथील नागरिक व पदाधिकाऱ्यांनी मोठा पाठपुरावा केला. त्यांचा एक संघपणा व सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांना आलेले हे यश आहे .- रणजितसिंह मोहिते-पाटील, विधान परिषद सदस्य
पद गेल्याचे दुःखं नाही – शीतलदेवी
अकलूज नगर परिषद झाल्याने येथिल जि.प. सदस्या शितलदेवी मोहीते पाटील यांचे सदस्यपद जाणार आहे. पण पदापेक्षा नागरीकांचा विकास महत्वाचा असल्याने मला आनंदच होत असल्याचे शीतलदेवी मोहिते पाटील यांनी सांगातले.
