राज्य
सहा पालखी सोहळ्यातील 344 दिंड्यांना अनुदान देण्यास मान्यता
-
पंढरपूर – राज्यातील मानाच्या दहा पालखी सोहळ्यांपैकी 6 पालखी सोहळ्यातील 344 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजार रुपये प्रमाणे 68 लाख 80 हजार रुपये अनुदान देण्यास पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी प्रशासकीय मान्यता दिली असल्याची माहिती शिवसेना धर्मवीर वारकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी दिली .
आषाढी एकादशीपूर्वी राज्यातील मानाच्या दहा पालखी सोहळ्यातील सुमारे 1500 दिंड्याना वारकरी दिंडी सन्मान निधी योजनेची 20 हजार रुपये रक्कम थेट लाभधारक दिंडी किंवा दिंडी चालक यांच्या नावावर मिळावी, याबाबत शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रमुख अक्षय महाराज भोसले यांनी शासन दरबारी जोरदार प्रयत्न केले होते.
पालखी सोहळ्या बरोबर चालणार्या असंख्य दिंड्या या परंपरेने चालत असल्यामुळे त्या धर्मादाय आयुक्तांकडे नोंदण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे शासनाने जरी अनुदान जाहीर केले असले तरी त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता त्यांना करणे शक्य नसल्याने या दिंड्याना शासनाच्या अनुदानाचा प्रत्यक्ष लाभ मिळणे अशक्य होते. त्यामुळे हे अनुदान दिंडी चालकाच्या नावावर मिळावे, अशी मागणी दिंडी चालकांनी केली होती. त्यानुसार मानाच्या दहा पालख्यातील सुमारे 1500 दिंड्यांच्या नावावर किंवा नोंदणीकृत नसलेल्या दिंड्यांच्या चालकांच्या नावावर अनुदानाची 20 हजार रूपये रक्कम जमा करण्यात येणार आहे .
राज्यातील सहा पालखी सोहळ्यांमधील 344 दिंड्यांने जे अनुदान मिळणार आहे त्या पुढील प्रमाणे संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा त्र्यंबकेश्वर – 52 दिंड्या, संत सोपानदेव महाराज -99 , संत मुक्ताबाई – 119 , संत एकनाथ महाराज -40, संत चांगावटेश्वर -32, माता रुक्मिणी 2 दिंड्या. या मानाच्या पालखी सोहळ्यात चालणार्या सुमारे 344 दिंड्यातील सुमारे तीन लाख वारकर्यांना या अनुदानाचा लाभ मंजूर करण्यात आला असल्याचे अक्षय महाराज भोसले यांनी सांगितले.
सदर दिंडीचे खाते असल्यास खात्यावर किंवा दिंडी प्रमुखाच्या खात्यावर निधी वर्ग करण्यात येईल. संत ज्ञानेश्वर महाराज , संत तुकाराम महाराज , संत नामदेव महाराज व संत निळोबाराय या पालखी सोहळ्यात चालणार्या दिंडी प्रमुखाचे खाते क्रमांक, बँक नाव, शाखा व आयएफएससी कोडं ही माहिती उपलब्ध होताच अनुदानाची रक्कम सदर दिंडीच्या किंवा दिंडी चालकाच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.