केंद्राने राजीव गांधी यांचे नाव काढले, आता “मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार” असे नामकरण ! महान खेळाडूचा सन्मान
केंद्र सरकारने शुक्रवार 6 ऑगस्ट रोजी राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून त्या जागी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद असे केले आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. तीन ऑलिम्पिक स्पर्धात सलग सुवर्णपदक मिळवून देणार्या मेजर ध्यानचंद यांचे नाव या पुरस्काराला दिले गेल्याने क्रीडाप्रेमींमधून आनंद व्यक्त केला जात आहे. आता पद्मभूषण ध्यानचंद यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानीत करावे अशी मागणी होत आहे.
पंतधान मोदी यांनी शुक्रवारी सकाळी खेळरत्न पुरस्काराचे नाव बदलल्याची घोषणा केल्यानंतर क्रीडा जगतासह अनेकांनी याचे स्वागत केले आहे. ध्यानचंद यांना हॉकीचा जादूगार म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या हॉकीची जादू पाश्चात्य देशात खूप मोठी होती. जर्मनीचा हुकूमशहा हिटलर यांनी मेजर ध्यानचंद यांना जर्मनीत राहण्याचे निमंत्रण दिले होते. कारण जर्मनीतच ऑलिम्पिक पदक जिंकून भारताचा झेंडा मेजर ध्यानचंद यांनी मैदानावर फडविला आणि तो ही हिलटर यांच्यासमोर. मेजर ध्यानचंद यांच्या जिगरबाज खेळ व राष्ट्रवाद पाहून भारावलेल्या हिटलरने त्यांना भोजनाचे निमंत्रणही दिले होते. मेजर ध्यानचंद यांनी ऑस्ट्रेलियाच्या हॉकी टीमचे कोच व्हावे यासाठी त्या देशाने खूप प्रयत्न केले पण ध्यानचंद यांनी ज्या देशासाठी मी पदक कमवत आलो त्या माझ्या देशाला हरविण्यासाठी अन्य कोणा देशाचा कोच मी बनणार नाही अशी भूमिका घेतली व आर्थिक परिस्थिती बेताचीच असली तरी पैशासाठी अन्य देशात जाणे पसंत केले नाही.
ध्यानचंद सिंग यांचा जन्मा29 ऑगस्ट 1905 ला झाला होता. शिक्षणानंतर ते सैन्यात भरती झाले होते. भारतीय हॉकी चे नावाजलेले खेळाडू होते. त्यांना जागतिक खेळ विश्वातील सर्वोत्कृष्ट हॉकीचे खेळाडू म्हणून ओळखले जाते. त्यांनी भारताला 1928, 1932 व 1936 मध्ये ऑलिम्पिक सुवर्ण पदक मिळवून दिले. त्यांच्या काळात भारतीय संघ सर्वात शक्तिशाली संघ म्हणून ओळखला जायचा. मेजर ध्यानचंद यांनी आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 1948 मध्ये खेळला. त्यांनी दिलेल्या योगदानाचा प्रभाव इतका मोठा होता की भारताने 1928 ते 1964 दरम्यान झालेल्या 8 ऑलिम्पिक स्पर्धेपैकी 7 स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविली. जर्मनी संघाला 1936 मध्ये 8-1 ने नामावल्यानंतर, त्यांच्या खेळाने प्रभावित होऊन हिटलरने त्यांना आपल्या सैन्यात वरिष्ठ पदाची ऑफर दिली होती जी त्यांनी नाकारली. त्यांनी आपल्या आंतराष्ट्रीय काराकीर्दीत 400 पेक्षा अधिक गोल केले जे हॉकीच्या इतिहासात एका खेळाडूने केलेले सर्वाधिक गोल्स आहेत. भारत सरकारने 1956 साली त्यांचा पद्मभूषण या पुरस्काराने सन्मान केला. त्यांचा जन्मदिवस भारतीय खेळ दिवस म्हणुन साजरा केला जातो.
ध्यानचंद यांचा जन्म उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे झाला. त्यांचे मोठे भाऊ रूपसिंग हे सुद्धा हॉकीचे खेळाडू होते. ध्यानचंद यांचे वडिल सामेश्वर दत्त सिंग हे ब्रिटिश सैन्यात होते. ते सुद्धा सैन्यात हॉकी खेळायचे. अशाप्रकारे ध्यानचंद यांना हॉकीचे बाळकडू लहानपणापासूनच मिळाले. त्यांचा मृत्यू 3 डिसेंबर 1979 मध्ये दिल्लीतील एम्स रूग्णालयात झाला. त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी सतत जोर धरत असते. भारताला 41 वर्षानंतर 2021 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये हॉकीत कांस्यपदक मिळाले आहे. आता केंद्र सरकारने शुक्रवारी खेलरत्न पुरस्काराचे नाव राजीव गांधी असे न ठेवता ते मेजर ध्यानचंद यांच्या नावाने केले आहे.