राजकिय

माळशिरस तालुका : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये आमदार रणजितदादांची भूमिका ? 





माळशिरस तालुक्याच्या राजकारणात मोहिते पाटील आणि माजी आमदार राम सातपुते यांच्यात राजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर आता होणाऱ्या जिल्हा परिषद ,पंचायत समिती व अकलूज नगरपरिषद निवडणुकीमध्ये मोठी चुरस निर्माण होणार, असे दिसत असून भारतीय जनता पक्षाने शहरावर वर्चस्व मिळण्यासाठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. दरम्यान राजकारणामध्ये मुरलेला मोहिते पाटील गट येथे सातपुते व अन्य विरोधकांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी मोठी व्यूहरचना आखणार हे निश्चित आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत माळशिरस तालुक्यात विधानपरिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे.

2024 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटील व भाजप असा संघर्ष माढा लोकसभा मतदारसंघात व नंतर विधानसभेला पहावयास मिळाला. या निवडणुकांमध्ये भाजपाचे असणारे रणजितसिंह मोहिते पाटील यांनी तटस्थ भूमिका घेतली होती. लोकसभेला त्यांचे बंधू धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार होते. तर विधानसभेला माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी महाविकास आघाडीच्या प्रचारात मोठी भूमिका बजावली होती. या निवडणुकांमध्ये आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे शांतच होते.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहिते पाटील ब्रँड अजूनही ताकदवान आहे हे दिसून आले. यामुळेच येथे शरद पवार यांच्या पक्षाला चांगले मतदान झाले. विजयसिंह मोहिते पाटील हे राजकारणातील शांत व संयमी नेतृत्व मानले जाते. त्यांच्यावर विश्वास ठेवणारा मोठा मतदार या सोलापूर जिल्ह्यात आहे, हे या निवडणुकांच्या निमित्ताने पुन्हा दिसून आले. मोहिते पाटील यांनी भाजपपासून हरकत घेतलीच नव्हती, मात्र माढा लोकसभेला त्यांची उमेदवार बदलाची मागणी भाजपने मान्य न केल्याने पुढील काळात आपली ताकद अबाधित ठेवण्यासाठी मोहिते पाटील गटाने आपली भूमिका बदलली व यात ते यशस्वी झाले.
2019 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत यास मोहिते पाटील गटाने भाजपला सोलापूर जिल्ह्यात चांगले यश मिळवून दिले तर रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेत ही भाजप प्रणित आघाडीला सहकार्य केले होते.
विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजप प्रणित महायुतीची सत्ता आल्यानंतर आमदार मोहिते पाटील यांच्यावर भाजपने शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी सोलापूर लोकसभा व माळशिरस विधानसभेला पराभूत झालेले राम सातपुते यांनी सतत लावून धरली. मात्र भाजपच्या वरिष्ठांनी वर्ष होत आले तरी याकडे कानाडोळा केल्याचे वास्तव आहे. उलट आमदार मोहिते पाटील हे आता भाजपाच्या सर्वच कार्यक्रमांना सर्वाधिक उपस्थिती दर्शवताना दिसत आहेत.
भाजपने सोलापूर जिल्ह्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. माळशिरस तालुक्यात जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून अकलूज नगर परिषदेसाठी येथे तीव्र राजकीय संघर्ष होणार हे निश्चित आहे. या काळात आमदार मोहिते पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. कदाचित भाजप या निवडणुकीत रणजितसिंह मोहिते पाटील काय भूमिका घेतात ?याकडेच लक्ष ठेवून असावे, असे दिसत आहे.
भाजपने अकलूजमध्ये मतदारांना आकर्षित करण्याकरता अनेक प्रयत्न सुरू केले आहेत. महिलांसाठी तीर्थक्षेत्र यात्राही आखल्या आहेत. याचबरोबर अनेक शाखा उघडून कार्यकर्ते जोडण्याचे काम माजी आमदार राम सातपुते व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सुरू केले आहेत. कोणत्याही परिस्थितीत अकलूजमध्ये कमळ फुलवण्याची जिद्द सातपुते यांनी बाळगली असून त्यांना यात कितपत यश येणार हे निवडणुकीच्या निकालानंतरच कळणार आहे. अकलूज मोहिते पाटील यांची कर्मभूमी आहे. आजवर या शहराने विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर विश्वास दाखवला आहे.  येथे मोहिते पाटील विरोधकही आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. नगरपरिषद तयार झाल्यानंतर अकलूजची ही पहिलीच निवडणूक असणार आहे.  यापूर्वी माळशिरस तालुक्यात माळशिरस, नातेपुते व महाळुंग श्रीपूर या नगरपंचायतीच्या निवडणुका पार पाडल्या होत्या . या निवडणुकांमध्ये भाजपमधील अंतर्गत राजकीय संघर्ष समोर आला होता. मोहिते पाटील गटाला शह देण्याचा प्रयत्न या निवडणुकांमध्ये तत्कालीन भाजपच्या नेत्यांनी केला होता.
मोहिते पाटील यांच्या भाजपतील प्रवेशानंतर माळशिरस तालुक्यात या पक्षाची ताकद वाढली होती. मात्र लोकसभा  निवडणुकीत खासदार धैर्यशील मोहिते पाटील पक्ष बदलल्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघाबरोबरच माळशिरस तालुक्यातही भाजपला नुकसान सहन करावे लागले आहे.
माळशिरस तालुक्याच्या राजकारणात विजयसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील यांची जोरदार पकड आहे. अशा परिस्थितीत आता खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत आहेत तर रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये काम करतात. अशा परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत त्यांच्या भूमिका काय असणार?   हीच चर्चा सोलापूर जिल्ह्यात जोर धरू लागली आहे.
भाजपने सोलापूर जिल्ह्यात  बेरजेचे राजकारण सुरू केले असून अनेकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न चालू ठेवला आहे. अशा परिस्थितीत मोहिते पाटील यांना दुखावून वजाबाकी करण्याची तयारी या पक्षाची दिसत नाही. मात्र यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता असल्याचे चित्र आहे. माजी आमदार राम सातपुते यांना पक्ष मोठी जबाबदारी देईल , अशी चर्चा सतत घडून आणली जात आहे. येथील राजकारणात मोहिते पाटील यांना शह देण्याकरता सातपुते यांना ताकद देण्याचा प्रयत्न पक्षाकडून होताना दिसतो. मात्र सध्या आमदार मोहिते पाटील ही भाजपचेच काम करत असल्याने महायुतीतही संभ्रमाचे वातावरण आहे.
येणाऱ्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत आमदार मोहिते पाटील यांची भूमिका लक्षात आल्यानंतर चित्र स्पष्ट होऊ शकते. या तालुक्याच्या राजकारणात पक्षीय निवडणूक होणार की आघाड्यांचे राजकारण चालणार यावरही बरेच काही अवलंबून आहे. मात्र भाजप हा कमळाच्या चिन्हावर लढण्याकरता आग्रही आहे. विधानसभा निवडणुकीत मतदारांनी राम सातपुते यांनाही चांगले मतदान केल्यामुळे सातपुते समर्थक व भाजप यांचेही मनोधैर्य उंचावले असल्याचे चित्र आहे. यामुळेच माळशिरस तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत चांगले यश मिळवण्याची पक्षाला आशा आहे.

   

Header
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close