युटोपियन अन्य कारखान्यांच्या ऊस गाळपास तयार, शेतकर्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन
मंगळवेढा – गळीत हंगामात कारखान्याचे मार्गदर्शक आमदार प्रशांतर परिचारक यांच्या सूचनेनुसार पंढरपूर-मंगळवेढा व मोहोळ या तालुक्यातील इतर कारखान्याच्या सभासदांचा संपूर्ण ऊस गाळप केला जाईल. त्यामुळे ऊस उत्पादकांनी चिंता न करता युटोपियन कारखान्याच्या शेती विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष उमेश परिचारक यांनी केले.
कचरेवाडी येथील युटोपियन शुगर्स कारखान्याच्या आठव्या गळीत हंगामाचे बॉयलर पूजन व अग्निप्रदीपन रविवारी कारखान्याचे अध्यक्ष उमेश परिचारक युवा नेते रोहन प्रशांत परिचारक यांच्या हस्ते संपन्न झाले. या हंगामात कारखान्यान साडेसहा लाख मे. टन ऊस गाळपाचे उदिष्ट ठेवले आहे. प्रारंभी सिव्हिल इंजिनियर अनिल भोसले यांच्या हस्ते सपत्नीक सत्यनारायण महापूजा करण्यात आली.
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष उमेश परिचारक म्हणाले , मागील सातही हंगामात युटोपियनने भरीव कामगिरी केली आहे. चालू गळीत हंगामात साडेसहा लाख मे. टन ऊस गाळप केला जाईल. तसेच बी हेवी मोलॅसेस पासून दीड कोटी लीटर इथेनॉल उत्पादित केले जाणार आहे.
कारखान्याने या वर्षी 200 ट्रॅक्टर, 150 मिनी ट्रॅक्टर, व 20 बैलगाडी या प्रमाणे करार केले असून ही सर्व वाहने व तोडणी कामगार येत्या 15 ते16 ऑक्टोंबरपर्यंत कार्यक्षेत्रामध्ये पोहोचतील याची खबरदारी कारखान्याने घेतली आहे. तसेच कारखान्याच्या व्यवस्थापनामध्ये पुढील काळात रोहन प्रशांत परिचारक मदत करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी महादेव लवटे, सुरेश टिकोरे उपस्थित होते. आभार लक्ष्मण पांढरे यांनी मानले.