मुंबई – हैदराबाद बुलेट ट्रेन व पंढरपूर -लोणंद रेल्वे मार्गातील अडचणींच्या निराकरणासाठी लवकरच पुणे येथे विशेष बैठक
अकलूज -पंढरपूर -लोणंद रेल्वे मार्ग व मुंबई – हैदराबाद बुलेट ट्रेन यासंदर्भात अडचणींचे निराकरण करण्यासाठी संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर पुणे येथे विशेष बैठक लावण्यात येईल असे आश्वासन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी या संदर्भात आज (मंगळवार दि. २७ ) रोजी नवी दिल्ली येथे रावसाहेब दानवे यांची भेट घेतली.
गत १०० वर्षांपासून रखडलेला पंढरपूर – लोणंद रेल्वे मार्ग पूर्णत्वास नेण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा गत अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे .त्यानंतर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही या प्रश्नी लक्ष घातले आहे. पंढरपूर ते लोणंद या १४५ किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गा पैकी लोणंद ते फलटण पर्यंत ३६ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. मात्र फलटण ते पंढरपूर चे काम प्रलंबित आहे .या कामातील सर्वे बाबत संभ्रम निर्माण करण्यात आला. त्यानंतर ब्रिटिश काळात जो सर्वे झाला त्याप्रमाणेच हा मार्ग करण्यासाठी केंद्रीय पातळीवर जोर लावण्यात येत आहे. त्यासंदर्भात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन या रेल्वे मार्गाबाबत चर्चा केली. सध्या संसदेचे अधिवेशन चालू आहे. हे अधिवेशन संपल्यानंतर पुणे येथे रेल्वे विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित पदाधिकारी यांची पुणे येथे बैठक घेऊन या यासंदर्भातील अडचणींवर तोडगा काढला जाईल असे आश्वासन दानवे यांनी दिले.
द्रुतगती रेल्वे मंडळाने देशात विविध ठिकाणी बुलेट ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामध्ये मुंबई ते हैदराबाद या बुलेट ट्रेनचा समावेश आहे .ही बुलेट ट्रेन सोलापूर जिल्ह्यात माळशिरस ,पंढरपूर ,मोहोळ उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट या सहा तालुक्यामधील ६२ गावांमधून जाणार आहे. त्यापैकी उत्तर सोलापूर व अक्कलकोट तालुक्यात याचे सामाजिक सर्वेक्षण सुरू आहे .त्यानंतर हा बुलेट ट्रेन मार्ग वळवण्या संदर्भात चर्चा सुरू झाल्या होत्या. परंतु या बुलेट ट्रेन चा मार्ग पूर्वी ठरल्याप्रमाणेच राहील असा निर्णय रेल्वे मंडळाने घेतला आहे .त्यासंदर्भातही पुणे येथे होणाऱ्या बैठकीत चर्चा होणार असल्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले.
चौकट ….
बुलेट ट्रेनचा मार्ग व जाणार्या तालुक्यातील गावांची नावे:. माळशिरस ः भांबुर्डे, पळसमंडळ, तिरवंडी, चाकोरे, कोंडबावी, बागेचीवाडी, _गिरझणी, चोंडेश्वरवाडी, दत्तनगर, वेळापूर, उघडेवाडी, धानोरे, तोंडले. एकूण गावे १३. पंढरपूर ः शेंडगेवाडी, केसकरवाडी, धोंडेवाडी, सुपली, भंडीशेगाव, उपरी, गादेगाव, कोर्टी, टाकळी, कासेगाव, गोपाळपूर, अनवली, कोंढारकी, रांजणी, आंबे, सरकोली, सवतगव्हाण, पुळूजवाडी. एकूण १८ गावे.मोहोळ ः वडदेगाव, कोथाळे, सोहाळे, वाघोली, कुरूल, कामती बुद्रूक, लमाण तांडा, कामती खुर्द, शिंगोली, तरटगाव. एकूण गावे १०.उत्तर सोलापूर ः तिर्हे, पाथरी, बेलाटी, कवठे, सलगर वाडी, प्रतापनगर, सोरेगाव, कुमठे. एकूण गावे ८. दक्षिण सोलापूर ः सावतखेड, होटगी, हणमगाव, वळसंग. एकूण गावे ४.अक्कलकोट ः कर्जाळ, कोन्हाळी, हसापूर, अक्कलकोट (ग्रामीण), ममदाबाद, निमगाव,हत्तीकणबस, चिक्केहळ्ळी, सलगर या गावांचा समावेश आहे. एकूण गावे ९