किसान रेल्वेने दिला शेतकर्यांना आधार, १५ महिन्यात मध्य रेल्वेच्या ८०० फेर्या
पंढरपूर – शेतीमाल देशात मागणी असणार्या बाजारपेठेत वेळेत पोहोचावा या उद्देशाने मध्य रेल्वेने किसान रेल्वे सुरू केली आणि आता याच्या जवळपास 800 फेर्या पूर्ण झाल्या असून यातून 2 लाख 75 हजार टन फळे आणि भाजीपाल्याची देशभरातील विविध राज्यात वाहतूक केली आहे.
सोलापूर विभागातील डाळिंब, द्राक्षे, लिंबू, सिमला मिरची, खरबूज, पेरू, सीताफळ, बोर, लातूर आणि उस्मानाबाद विभागातील फुले, अहमदनगर आणि नाशिक विभागातील कांदा, सोलापूर जिल्ह्यातील तसेच भुसावळ आणि जळगाव विभागातील केळी, नागपूर विभागातून संत्री आणि इतर फळे व भाजीपाला दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल यासारख्या दूरच्या बाजारपेठेत जलद आणि ताजी राहतील अशा पद्धतीने किसान रेल्वेद्वारे पाठविल्याने शेतकर्यांनाही त्यांच्या मालाला चांगला भाव मिळत आहे. यातून शेतकर्यांनाही चांगले उत्पन्न मिळत असून शेतकर्यांचे जीवनमान उंचावले आहे.
रेल्वेने शेतकर्यांचा नाशवंत माल वेळेवर देशभरातील बाजारपेठापर्यंत पोहोचावा या उद्देशाने ऑगस्ट 2020 पासून किसान रेल्वे सुरू केली. यास शेतकर्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. यात सोलापूर जिल्ह्याचाही समावेश आहे. पहिली किसान रेल्वे सुरू झाल्यापासून मध्य रेल्वेने किसान रेल्वेच्या 800 फेर्यांमधून 2 लाख 75 हजार 761 टन नाशवंत मालाची वाहतूक केली आहे. मध्य रेल्वेच्या किसान रेल्वेने आपल्या 800 व्या फेरीत 207 टन फळे, भाजीपाला यामध्ये पपई, डाळिंब, केळी, कांदा आदी शेतमाल सांगोला, दौंड आणि येवला स्थानकावरून बिहार राज्यातील दानापूर, मुझफ्फरपूर मध्य रेल्वे 2.75 लाख टन शेतमालाची देशभरात वाहतूक किसान रेल्वेच्या 800 फेर्या पूर्ण येथे नेला आहे. 7 ऑगस्ट 2020 रोजी पहिली किसान रेल्वे चालविण्याचा मान मध्य रेल्वेला मिळाला. त्यानंतर 28 डिसेंबर 2020 रोजी किसान रेल्वेची 100 वी फेरीही चालवण्याचा मान मध्य रेल्वेला मिळाला होता. ज्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेबलिंकद्वारे हिरवा झेंडा दाखवला होता. 12 ऑगस्ट 2021 रोजी किसान रेल्वेची 500 वी फेरी ही मध्य रेल्वेतून गेली त्यानंतर किसान रेल्वेची 800 वी फेरी 28 नोव्हेंबर 2021 रोजी मध्य रेल्वे सोलापूर विभागातील सांगोला स्थानकावरून मुझफ्फरपूरकडे रवाना झाली आहे.
जलद वाहतूक, 50 टक्के अनुदानासह शेतमालासाठी मोठ्या आणि नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश सुनिश्चित करून किसान रेल्वे महाराष्ट्रातील शेतकर्यांसाठी समृद्धी, आनंद आणि आशा घेऊन आली आहे. किसान रेल्वेच्या 800 फेर्या जलद आणि सुरक्षित वाहतूक आणि नवीन मोठ्या बाजारपेठांमधील प्रवेशासह शेतकर्यांना प्रचंड फायदे स्पष्ट करतात, असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी म्हणाले. मध्य रेल्वे सध्या सात किसान रेल्वे चालवते. त्यामध्ये देवळाली- मुझफ्फरपूर, सांगोला- मुझफ्फरपूर, सांगोला- आदर्श नगर दिल्ली, सांगोला- शालिमार, रावेर- आदर्श नगर दिल्ली, सावदा- आदर्श नगर दिल्ली आणि गोधनी- आदर्श नगर दिल्ली आदींचा समावेश आहे. यातील चार किसान रेल्वे या सोलापूर विभागातून धावत आहेत. किसान रेल्वे व्यतिरिक्त अनेक अनशेड्यूल किसान रेल्वे चालवण्यात येत असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.