देश

जागतिक पातळीवरील तज्ज्ञांच्या उपस्थितीत स्वेरीत ग्रामीण विकासासाठी नवकल्पना व उद्योजकतेला गती देण्यासाठी संमेलनाचे आयोजन

पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये येत्या दि. ४ व ५ नोव्हेंबर, २०२२ रोजी स्वेरीज सोबस सेंटर ऑफ एक्सलंस, सोबस, बेंगलोर आणि व्हील्स ग्लोबल फौंडेशन, अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अॅसलरेटींग रुरल इनोव्हेशन अँड सोशल एन्टरप्रेनरशिप (ग्रामीण भागाच्या विकासासाठीच्या नवकल्पना व उद्योजकतेला गती देणे) या विषयावरील संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून या चर्चासत्रात जागतिक पातळीवरील तंत्रज्ञानातील व उद्योग विश्वातील तज्ञ मंडळी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.
ग्रामीण नवकल्पनांना चालना देणे व त्याद्वारे ग्रामीण उद्योजकता विकासास गती देण्याच्या दृष्टीकोनातून स्वेरी मध्ये सोबस सेंटर ऑफ एक्सलंस ची स्थापना करण्यात आली आणि त्याद्वारे ग्रामीण विकासासाठीचे नवनवीन उपक्रम राबवले जातात. अशाच उपक्रमांचा एक भाग म्हणून दि. ४ व ५ नोव्हेंबर २०२२ या दोन दिवस होणाऱ्या या संमेलनात स्थानिक नवकल्पनांचे प्रदर्शन आणि मार्गदर्शनपर सत्रे आणि दुसऱ्या दिवशी जागतिक पातळीवरील प्रख्यात मान्यवरांची चर्चा यांचा समावेश असेल. व्हील्स ग्लोबल फाउंडेशन, अमेरिका ही जागतिक पातळीवरील एक प्रख्यात संस्था आहे जी भारतातील आय.आय.टी च्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेली आहे. हि संस्था जल व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण, ऊर्जा संवर्धन आणि शाश्वत विकास या सर्व बाबतीत जागतिक पातळीवर कार्य करते. पंढरपूरच्या स्वेरीज सोबस सेंटर ऑफ एक्सलन्सच्या निधी आणि ज्ञान या बाबतीत ही संस्था भागीदार आहे. उद्योजकता आणि नवोपक्रमाशी संबंधित ऑन-ग्राउंड कामाची अनुभूती घेणे आणि विविध भागधारकांना भेटून सल्ला मसलत करणे हा या भेटीचा मुख्य हेतू आहे. या कार्यक्रमासाठी व्हील्स ग्लोबल फाउंडेशन (युएसए)चे अध्यक्ष सुरेश शेणॉय, मास्टेक चे संस्थापक चेअरमन आणि व्हील्स ग्लोबल फाउंडेशनचे अध्यक्ष अशांक देसाई, सोबस इनसाइट फोरम, बेंगलोर चे व्यवस्थापकीय संचालक दिग्विजय चौधरी यांच्यासोबत व्हील्स ग्लोबल फाउंडेशनचे १० पेक्षा अधिक मान्यवर उपस्थित असणार आहेत. या भेटी दरम्यान दोन्ही दिवस विविध उपक्रम असणार आहेत. या संमेलनामध्ये स्वेरीचे विद्यार्थी त्यांच्या नवनवीन प्रकल्पांचे सादरीकरण करणार आहेत. त्याचबरोबर स्थानिक नवउद्योजकही या संमेलनात सहभागी होऊन आपल्या उद्योगाच्या स्थापनेबद्दल मनोगत व्यक्त करणार आहेत. स्वेरी कॅम्पसमध्ये या उपक्रमासाठी जय्यत तयारी सुरु असून सर्व सहभागी नवउद्योजकांना बौद्धिक मेजवानीही मिळणार आहे. सोबसच्या संचालक रेषा पटेल, गिरीष संपत, आकांक्षा सिन्हा, ईशान पंत तसेच स्वेरीतील शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. आर. आर. गिड्डे, डॉ. प्रवीण ढवळे यांच्यासह इतर प्राध्यापक वर्ग परिश्रम घेत आहेत.

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close