पंढरीत माघी सोहळ्याचा उत्साह, लाखो भाविक दाखल
पंढरपूर, दि. १ – आज बुधवारी माघी एकादशीचा महासोहळा पंढरपूरमध्ये साजरा होत असून यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात येथे दाखल झाले आहेत. पायी येणार्या दिंड्याही येथे पोहोचल्या आहेत. सुमारे तुन लाखांहून अधिक वारकरी येथे आले आहेत.
पहाटेपासून चंद्रभागेच्या पात्रात स्नानासाठी गर्दी होती. पहाटे. पूजेनंतर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. आज मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
पंढरपूरमध्ये 26 जानेवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान माघी यात्रा पार पडत असून येथे प्रशासनाने येणार्या भाविकांचे आरोग्य, स्वछता व सुरक्षेला प्राधान्य दिले असून, भाविकांच्या मदतीसाठी चार ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती प्रातांधिकारी गजानन गुरव यांनी दिली.
65 एकरमध्ये दिंड्यासाठी 435 प्लॉटचे वाटप करण्यात आले आहे. तर 227 दिंड्या येथे दाखल झाल्या आहेत. तर 3 लाख 38 हजार 227 भाविकांची नोंदणी झाली आहे. दशमीला दुपारपर्यंत 1 लाख 10 हजार भाविक दाखल झाले होते. तर एकादशीला सकाळपर्यंत तीन लाख भाविक दाखल झाले असावेत असा अंदाज आहे.
65 एकरमध्ये भाविकांसाठी नगरपालिका प्रशासनाकडून पिण्याचे शुद्ध पाणी, वीज, सुरक्षा, आरोग्य, शौचालय या आवश्यक सुविधा उलब्ध करुन दिल्या आहेत. भाविकांच्या मदतीसाठी व आवश्यक सेवा सुविधा देण्यासाठी येथे आपत्कालीन मदत केंद्र 24 तास कार्यरत ठेवण्यात आले असल्याचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी सांगितले.
वारीत येणार्या भाविकांना आवश्यक सोयी-सुविधा तत्काळ मिळाव्यात त्याचबरोबर आरोग्याच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतेही गैरसोय येऊ नये यासाठी पत्राशेड, 65 एकर, चंद्रभागा वाळवंट, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर या चार ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना केली आहे. तसेच चंद्रभागा नदीपात्रात स्नानासाठी भाविक मोठ्या प्रमाणात जातात त्यांच्या सुरक्षेसाठी आपत्ती व्यवस्थानतर्गंत दोन यांत्रिक बोटी प्रशिक्षित कर्मचार्यांसह तैनात ठेवण्यात आल्या आहेत.
माघ यात्रा सुरक्षित पार पाडण्यासाठी यात्रा कालावधीत भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक उपाययोजना केल्या असून, भाविकांना सरंक्षण देण्यासाठी, चोरी रोखण्यासाठी वारकरी वेषात पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात केले आहेत. तर 125 सीसीटीव्ही कॅमेर्याच्या माध्यमातूनही लक्ष ठेवले जात असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले.