राज्य

विषबाधा प्रकरणातील सर्व भाविकांची प्रकृती स्थिर, अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले

पंढरपूर दि. २-  माघी वारीसाठी पंढरपूरला आलेल्या संत निळोबा महाराज सेवा मंडळ त्यागमूर्ती बबन महाराज भक्त सदनातील  137 भाविकांना अन्नातून  विषबाधा झाल्याने त्यांना  तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या सर्व भाविकांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली.


पंढरपूर सध्या माघीचा उत्सव साजरा होत असून काल बुधवारी एकादशी निमित्त पंढरपूर येथील या मठात नांदेड, हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यातून भाविक आले होते. एकादशी दिवशी रात्री 8 ते 9  या कालावधीत उपवासाच्या फराळात त्यांनी भगर, आमटी व पाणी हे पदार्थ खाल्याने  यातून 137 भाविकांना विषबाधा झाली. त्यांना  उलटी, मळमळ, पोटदुखी , चक्कर अशी लक्षणे जाणवल्याने त्यांना पहाटे अडीच ते तीनच्या दरम्यान तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या भाविकांवर उपचार करण्यासाठी पहाटेपासून 22 डॉक्टरांचे पथक कामाला लागले होते तर या सर्व वारकर्‍यांना 108 क्रमांकाच्या रूग्णवाहिकेतून रूग्णालयात आणण्यात आले होते. तातडीने उपचार झाल्याने दिवसभरात जवळपास 133 जणांना डिसचार्ज देण्यात आला आहे तर सध्या चार जणांवर उपचार सुरू होते.
उपचार घेत असलेल्या भाविकांची प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी भेट घेवून प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांच्या समवेत तहसीलदार सुशील बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी अरविंद माळी, अन्न व औषध प्रशासन  सहायक आयुक्त सुनील जिंतूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बागडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय पाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले उपस्थित होते.    
संबधित ठिकाणच्या जेवणातील सर्व पदार्थांचे नमुने अन्न व औषध प्रशासन विभागाकडून घेण्यात आले असून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तत्काळ दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाला दिल्याचे  गजानन गुरव यांनी सांगितले.  तसेच वारी कालावधीत  नागरिकांनी व भाविकांनी उघड्यावरील पदार्थ खावू नयेत. मठात, धर्मशाळेत अन्न शिजवताना योग्य पध्दतीने शिजवावे, अन्न स्वच्छ जागेत शिजवावे, स्वच्छ पाण्याचा वापर करावा,  असे आवाहनही गुरव यांनी केले आहे.
दरम्यान नांदेड व हिंगोली भागातील हे वारकरी असून त्यांची दिंडी गेल्या पंचवीस वर्षापासून पंढरपूरच्या माघी वारीसाठी येत असते. यात 185 वारकर्‍यांचा समावेश आहे.

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close