चार महिन्यात उजनीतील किती पाण्याचा वापर झाला पाहा? यंदा पावसाळ्यापर्यंत धरण वजा पातळीत इतके ..% खालावेल !
पंढरपूर- सोलापूरसह पुणे व अहमदनगर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातील 37 टक्के म्हणजेच 21 टीएमसी पाणीसाठ्याचा वापर मागील चार महिन्यात झालेला आहे . यामध्ये पिण्यासाठी, शेती , उद्योगधंदे व वीजनिर्मिती यासह बाष्पीभवनाचा समावेश आहे.
सध्या धरणात 74 टक्के उपयुक्त तर एकूण 103 टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून शेतीसाठी कालव्यातून व सीना -माढा व दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी पाणी आवर्तन सुरू आहे. आगामी उन्हाळ्यात धरणातील पाणी कोणत्याही क्षेत्राला कमी पडणार नाही. परंतु मागील हंगामाप्रमाणे पाणी पातळी मायनस (उणे) 20 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. संपूर्ण उन्हाळ्यात कालव्यातील पाणी कायम सुरूच ठेवले जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती जलसंपदा सोलापूर विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली.
मागील 2022 च्या पावसाळ्यात 15 ऑक्टोबरपर्यंत उजनी धरण 111.21 टक्क भरले होते व 123.23 टीएमसी एकूण पाणीसाठा झालेला होता. सोलापूर जिल्ह्यात उशिरापर्यंत पाऊस झाला होता. त्यामुळे जानेवारी 2023 पर्यंत कालवा, बोगदा, नदी किंवा उपसा सिंचनाद्वारे शेतीला पाणी सोडण्यात आले नव्हते व तशी मागणी पण नव्हती. यानंतर कालवा पाणी वाटप समितीच्या निर्णयानुसार 22 ते 24 जानेवारी दरम्यान कालवा, बोगदा, सिंचन योजना व सोलापूर शहरासह इतर गावांसाठी भीमा नदीतील बंधारे भरून घेण्यासाठी धरणातून नदीत पाणी सोडण्यात आले होते.
23 जानेवारीला कालव्यातून शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सुरू केल्यानंतर डाव्या कालव्याला मोहोळ तालुक्यात पाटकूल भागातील 113 किलोमीटर हद्दीत मोठे भगदाड पडल्याने या कालव्यातून सोडले जाणारे पाणी बंद करावे लागले. परंतु सध्या 800 क्युसेक्स पाणी डाव्या कालव्यात सुरू असून ते पंढरपूर तालुक्यात 75 किलोमीटर हद्दीपर्यंत जाते. कुरुल हद्दीतील 113 किलोमीटरच्या ठिकाणचे कालव्याच्या दुरुस्तीचे काम सोमवारपर्यंत आटोक्यात येईल व नंतर डाव्या कालव्यातून दोन हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येणार आहे. याचा फायदा पंढरपूर, मोहोळ, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट तालुक्यातील शेतीला होईल. दरम्यान माळशिरस, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला या तालुक्यातील लाभक्षेत्रासाठी नियोजनाप्रमाणे उजव्या कालव्यातून पाणी सुरू होते. मात्र आता ते आवर्तन बंद करण्यात आले असल्याचे धीरज साळे यांनी सांगितले.
सध्या उजनी जलाशयात 74.18 टक्के पाणी असून 495. 600 मीटर पाणी पातळी आहे. एकूण साठा 103. 40 टीएमसी तर उपयुक्त साठा 39.74 टीएमसी आहे. धरणातून कालव्यात 800 तर सीना – माढा सिंचन योजनेसाठी 333 व दहीगाव योजनेसाठी 120 क्युसेकने पाणी सोडले जात आहे.