विशेष

अनियमित ऋतुमानामुळे यंदा दोन महिने उशिरा परदेशी पाहुणे उजनी जलाशयावर झाले दाखल

पंढरपूर – उजनी जलाशयाचे खास आकर्षण असलेले फ्लेमिंगो म्हणजेच रोहित हे नजाकतदार परदेशी पक्षी नुकतेच येऊन दाखल झाल्याची माहिती ज्येष्ठ पक्षी व पर्यावरण अभ्यासक डॉ.अरविंद कुंभार यांनी दिली आहे. सुमारे दोनशेहून अधिक संख्येतील फ्लेमिंगो धरण परिसरात आल्याने पक्षीप्रेमी व पर्यटकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे.
या वर्षी परतीच्या प्रवासाच्या वेळी प्रचंड  प्रमाणात बरसलेल्या पावसामुळे धरण काठोकाठ भरले होते. शिवाय या वर्षी धरणाच्या लाभक्षेत्रातील भूजल पातळीही समाधानकारक असल्याने धरणातील पाण्याचे विसर्ग लांबणीवर पडल्याने  तुडुंब भरून होते. त्यामुळे या पक्ष्यांना खाद्यान्न उपलब्ध होत नव्हते. या कारणामुळे हे पक्ष्यांनी आपल्या प्रवासाचे वेळापत्रक बदलून आगमन लांबणीवर टाकले होते. आता दोन महिने उशिर करून हे पक्षी जलाशयावर दाखल झाले आहेत.
सविस्तर माहिती अशी की, युरोपिय देशांमध्ये मूळ वास्तव्याला असलेले हे दिमाखदार पक्षी हिवाळ्यापूर्वी भारत व पाकिस्तान या देशांच्या सीमेवरील गुजरातच्या कच्छ भागात वीण घालतात. या ठिकाणी नवीन पिढीला जन्म घातल्यानंतर नवजात पिल्लांसह भारतात प्रवास करतात. पांढरेशुभ्र परंतु गुलाबी छटा असलेले पंख, आखुड वक्राकार केशरी चोच, गुलाबी रंगाचे लांब पाय तसेच बाकदार मान हे वैशिष्ट्य असणारे  फ्लेमिंगो अर्थात रोहित पक्षी सध्या माढा तालुक्यातील शिराळ, अकोले खुर्द, फुट जवळगाव करमाळा तालुक्यातील कुगाव, केडगाव, सोगाव, वाशिंबे, कोंडार चिंचोळी, टाकळी, कात्रज, डिकसळ, कर्जत तालुक्यातील खानोटा, इंदापूर तालुक्यातील पळसदेव इत्यादी गावांच्या  धरणकाठच्या शिवारात पसरलेल्या  पाणलोट क्षेत्रात दिवसभर विहार करताना नजरेस पडत आहेत.
जानेवारी महिन्याच्या मध्यावधीत उजनी धरणातून नदी, बोगदा व कालव्यातून दहा टीएमसी पेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग करण्यात आले. त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील पाणी पातळी कमी झाल्यानंतर या पक्ष्यांनी जमिनीचा चराऊ भाग उघडा पडत गेल्याचा  अचूक अंदाज घेत, स्थलांतरात अतिशय तरबेज असलेले रोहित पक्षी या ठिकाणी येऊन दाखल झाले आहेत. या पक्ष्यांचा पंखाखालील भाग रक्तवर्णीय असतो व ते आकाशात झेप  घेतल्यानंतर गडद लाल रंगाचे पंख ज्वाळाप्रमाणे दिसतात. या कारणामुळे या पक्ष्यांना अग्निपंख या नावाने संबोधतात. ज्या वेळी हे पक्षी उथळ पाण्यात उभारलेले असतात तेव्हा ते गुलाबी रंगमिश्रित धवलवर्णीय दिसतात व या कारणामुळे त्यांना रोहित या नावाने देखील ओळखतात.
फ्लेमिंगोंचे खाद्य हे मासे, खेकडे, गोगलगाय, शंख शिंपले इत्यादी मृदुकाय प्राणी, बेडूक व चिखलातील विविध कृमी कीटक हे या पक्ष्यांचे प्रमुख खाद्य असून ते पाणवनस्पती व शेवाळावरही ताव मारतात. उजनीच्या पाण्यात वाढणारे अटोलिया या तांबड्या शैवाल या पाणवनस्पतीचे सेवन केल्याने करड्या रंगाच्या पिल्लांना तांबडा रंग प्राप्त होतो. धरणातील  पाण्यात  विपुल प्रमाणात तांबडे शेवाळ वाढते हे धरणाचे वैशिष्ट्य आहे.

यंदा अनियमित ऋतुचक्र
उजनी वरील पक्ष्यांचे निरीक्षण व नोंदी घेण्यासाठी मी कित्येक वर्षांपासून पाणलोट क्षेत्रावर फिरत आहे. वर्षभरात अनेक वेळा उजनीला भेट देऊन तेथील पक्ष्यांच्या अधिवासाचा अभ्यास करतो. स्थलांतरित पक्षी नेहमी हवामानाचा अंदाज घेत धरण परिसरात  येत असतात. यावर्षी ऋतुचक्र अनियमित होऊन रोहित  पक्ष्यांच्या स्थलांतरावर परिणाम झाला होता. सतत बदलणार्‍या हवामानातही फ्लेमिंगो उजनी वर येऊन दाखल झाल्याने जलाशयाचे सौंदर्य वाढले आहे.
-डॉ. अरविंद कुंभार 

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close