सोलापूर जिल्ह्याला 7 एप्रिलला पावसाचा ऑरेंज अलर्ट,
खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे प्रशासनाचे आवाहन
सोलापूर, दि. 06, (जि. मा. का.) : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक ५ एप्रिल २०२३ रोजी दुपारी १.०० वाजता दिलेल्या सूचनेनुसार सोलापूर जिल्ह्यासाठी दिनांक ६ एप्रिल या दिवसासाठी यलो (Yellow) अलर्ट व दिनांक ७ एप्रिल या दिवसासाठी ऑरेंज (Orange) अलर्ट जारी केलेला आहे. दिनांक ७ एप्रिल २०२३ रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची व गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमिवर नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना अंमलात आणाव्यात, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
पत्रकात खालील प्रमाणे काळजी घेण्याचे आवाहन कऱण्यात आले आहे.
या गोष्टी करा :
(१) विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.
(२) आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेर ओट्यावर थांबू नका.
(३) आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.
(४) तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर राहा.
(५) पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.
(६) दामिनी अॅप वापरावे आणि वापराबाबत जनजागृती करावी.
लिंक(https://play.google.com/store/apps/details?id=com.lightening.live.damini&hl=en&gl=US&pli
या गोष्टी करू नका :-
(१) आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली आंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईप लाईन यांना स्पर्श करू नका. तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका.
(२) विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.
(३) उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका.
(४) धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका.
(५) जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.
00000