गुरूवारपासून श्रावण मासारंभ, श्री सिध्देश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम
सोलापूर – सोलापूरसह कर्नाटक आंध्रप्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील सिद्धरामेश्वर मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदादेखील पवित्र श्रावणमासानिमित्त श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटी आणि श्रावणमास उत्सव समितीच्यावतीने गुरुवार १७ ऑगस्ट पासून ते शनिवार १६ सप्टेंबर या दरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, श्रावणाच्या पार्श्वभूमीवर, येथील मंदिर व परिसरात संपूर्ण तयारी झाली असून आता केवळ भाविकांची आगमनाची प्रतीक्षा आहे.श्रावणमासानिमित्त दररोज श्री सिद्धरामेश्वरांचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, म्हणून सिद्धेश्वर मंदिरात महिला व पुरुष भक्तांसाठी दर्शन रांगेची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. भाविकांसाठी श्रावणी सोमवार निमित्त प्रत्यक्ष श्री सिद्धरामेश्वरांचे दर्शन घेता येणार नाही, अशा भक्तांसाठी प्रत्येक सोमवारी डिजिटल स्क्रिनद्वारे श्री सिद्धरामेश्वरांच्या दर्शनाची सोय केलेली आहे. दररोज पहाटे गाभाऱ्यातील श्री सिध्दरामेश्वरांच्या आरतीचे थेट प्रक्षेपण सकाळी १०:३० वा. केले जाणार आहे.
श्रावण मासानिमित्त श्री सिद्धरामेश्वर भक्तांची अलोट गर्दी होत असते. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यातून अनेक भाविक दर्शनासाठी दरवर्षी येत असतात. या सर्व भक्तांना निवासाची सोय तसेच महाप्रसादाची सोय करण्यात आलेली आहे. मंदिराचे पावित्र्य राखले जावे, यासाठी दैनंदिन स्वच्छतेपासून ते वाहनतळापर्यंतचे योग्य नियोजन श्रावणमास समितीच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. येणाऱ्या भक्तांच्या सुरक्षिततेसाठी मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत.याशिवाय खास सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आलेली असून प्रत्येक श्रावणी सोमवारी श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित श्री सिद्धेश्वर वूमन्स पॉलिटेक्निक, श्री सिद्धेश्वर विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थी स्वेच्छेने स्वयंसेवक म्हणून कार्य करणार आहेत. चार सोमवारी योगसमाधीवर अत्यंत नयनरम्य फुलांची आकर्षक सजावट करण्यात येणार आहे. अनुक्रमे सोमनाथ केंगनाळकर, माजी आमदार सिध्दराम म्हेत्रे, शिवानंद कोनापुरे आणि भारत तेलसंग यांच्याकडून सजावट केली जाणार आहे.
दररोज सकाळी ८:३० वा. श्री सिध्दरामेश्वरांच्या योगसमाधिची पूजादररोज सकाळी १०:३० वा. व दु. ४ वा. श्री सिध्दरामेश्वरांच्या गाभाऱ्यातील आरतीदररोज रात्री १० वा.शेजारती तसेच दररोज पहाटे ४ वा.श्री मल्लिकार्जुन मंदिरातून कावड मिरवणूक शिवयोगी श्री सिध्दरामेश्वरांनी स्थापन केलेल्या ६८ शिवलिंगांची पूजेसाठी येत असते. भाविकांना महाप्रसादाचे वाटपश्रावण मासानिमित्त येणाऱ्या भक्तांना विनामूल्य महाप्रसादाची व्यवस्था सकाळी ११ ते २ पर्यंत अन्नछत्रात करण्यात आलेली असून रोज सकाळी योग समाधी पूजेनंतर प्रसाद म्हणून बर्फी, लाडू, शिरा, साखर भात भाविकांना वाटप केले जाते. श्रावणमास उत्सवा निमित्त सर्व कार्यक्रमाचे सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सिद्धेश्वर देवस्थान श्रावणमास उत्सव समितीचे चेअरमन अॅड. रेवणसिद्ध पाटील यांनी केले आहेत.
श्रावणमास उत्सवानिमित्त सेवाभाववृत्तीने भजन सेवा व कीर्तन सेवा देण्यास इच्छुक असलेल्या भजन मंडळास वा संस्थेस श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरांत त्यांचा कार्यक्रम सादर करण्यास संधी देण्याचे समितीने ठरविले आहे. तसेच धार्मिक व भक्तिमय वातावरण निर्मितीसाठी भक्तिगीत व भावगीतांचा कार्यक्रम देखील करण्याचे योजले आहे.सेवाभाव वृत्तीने गायन, वादनाच्या माध्यमातून आपली सेवा रुजू करू इच्छिणाऱ्या व्यक्ती वा संस्थेने श्रावणमास उत्सव समितीचे सदस्य बाळासाहेब भोगडे यांच्याकडे वा श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटी कार्यालय येथे संपर्क साधून आपले नाव नोंदवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.