राजकिय

पक्षनिष्ठेमुळे सातपुते व निंबाळकर यांना मिळाली पुन्हा संधी



पंढरपूर, दि.29 –  भाजपात पक्षनिष्ठा महत्वाची असल्याने माढा लोकसभा मतदारसंघात पुन्हा खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तर सोलापूरमधून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी मिळाली आहे. या उमेदवारांनी पक्षाकडे मागणी न करता त्यांना संधी देण्यात आली आहे. या दोघांना 2019 च्या निवडणुकीत विजयी करण्यासाठी जंगजंग पछाडणारे अकलूजचे मोहिते पाटील मात्र सध्या भाजपा पासून दूर जात असल्याचे चित्र आहे.
राजकारणात कोणी कोणाचा कायम शत्रू नाही आणि कोणी कोणाचा कायमचा मित्र नाही, हे वाक्य येथील राजकारणात तंतोतंत लागू पडत आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सातारा जिल्हा काँगे्रस अध्यक्षपदाचा राजीनामा देवून रणजितसिंह नाईक निंबाळकर भाजपात आले व याचवेळी आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनीही पक्षप्रवेश केला होता. भाजपासाठी अनुकूल वातावरण नसताना निवडणुकीत जोरदार प्रचार करून निंबाळकर यांना विजयी करण्यात आले. माळशिरस तालुक्याने लाखाहून अधिकचे लीड दिले. यानंतर निंबाळकर यांनी भाजपाच्या वरिष्ठांशी कायम सलोख्याचे संबंध ठेवत पक्ष सांगेल ते ऐकले व याचे फळ म्हणजे त्यांची 2024 च्या निवडणुकीत पक्षाने राज्याच्या पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर केली. तत्पूर्वी अनेक योजना  माढा लोकसभा मतदारसंघात देवू केल्या.
धैर्यशील मोहिते पाटील असोत की रामराजे निंबाळकर  यांचा विरोध डावलून भाजपा आपल्या निर्णयावर ठाम राहिली व रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना ताकद देत राहिली आहे. राज्यातील महायुतीमुळे भाजपासाठी या मतदारसंघात आणखी सुकर झाल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. मोहिते पाटील व खा. निंबाळकर यांच्यातील वाद इतका विकोपाला गेला की दिलेल्या उमेदवारीला विरोध करत मोहिते पाटील हे अत्यंत आक्रमक झाले असून ते पक्षापासून दूर जाण्याच्या तयारीत आहेत व शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हावर लढण्याची त्यांची तयारी सुरू असल्याचे दिसत आहे. भाजपाकडून त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत तर दुसरीकडे त्यांच्याविना प्रचार यंत्रणा राबविली जात आहे. महायुतीचे या मतदारसंघातील बहुतांश आमदार भाजपासोबत दिसत आहेत.
दुसरीकडे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी अचानक राम सातपुते यांना माळशिरस विधानसभा मतदारसंघात पाठविले. या मतदारसंघात मोहिते पाटील आपल्या गटाच्या उमेदवाराला उभे करून निवडून आणण्याच्या तयारीत असताना सातपुते यांचा प्रचार त्यांना करावा लागला. सातपुते विजयी झाले व त्यांनी मतदारसंघात स्वतंत्र यंत्रणा उभा करून आपला जनाधार वाढविला व पक्षाचे कामही विस्तारले. एका बाजूला माढा लोकसभा मतदारसंघात डावलल्याने मोहिते पाटील नाराज असताना भाजपाने पक्षासाठी कार्य करणार्‍या आ. सातपुते यांना सोलापूर मतदारसंघाची उमेदवारी दिली. आता निंबाळकर व सातपुते यांनी आपला प्रचार सुरू केला आहे. तर दुसरीकडे मोहिते पाटील हे लोकभावना समजून घेण्यासाठी दौरे करत असून लवकरच निर्णय जाहीर करतील. जयसिंह मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या पक्षात जाण्याचे संकेत दिले आहेत.

Header
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close