राज्य

माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

पंढरपूर- अवघ्या तीन महिन्यांमध्ये माढा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याची तयारी करून ती जिंकणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अभिजीत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनामध्ये सहकुटुंब भेट घेतली. फडणवीस यांनीच पाटील यांना राजकारणापासून दूर न राहण्याचा सल्ला लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिला होता.
2024 च्या लोकसभा निवडणूक काळात आमदार अभिजीत पाटील अध्यक्ष असणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर राज्य शिखर बँकेने थकबाकीपोटी कारवाई केली होती व कारखान्याची गोडाऊन सील करण्यात आली. ऐन निवडणुकीत हा प्रकार घडल्याने अभिजीत पाटील यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री व आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तसेच भाजपच्या सांगण्यावरून त्यांनी माढा व सोलापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात रणजीतसिंह नाईक निंबाळकर व राम सातपुते या उमेदवारांना आपला पाठिंबा जाहीर केला. त्यावेळी गुरसाळे येथे झालेल्या सभेत अभिजीत पाटील यांनी कारखाना व सभासदांच्या हितासाठी आपण राजकारणात दोन पावलं मागे येण्यास तयार असल्याचे सांगत निवडणूक न लढण्याचा विचार व्यक्त केला होता. मात्र त्यावेळी देवेंद्र फडणीस यांनी पाटील यांनी आपल्या महत्त्वाकांक्षाला मुरड न घालता राजकारणामध्ये सक्रिय रहावे असा सल्ला दिला. कारखान्यास मदत करण्याची हमी दिली होती, यानंतर केंद्र सरकारच्या मदतीने विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला कर्ज मंजूर करण्यात आले व कारखान्यासमोरील आर्थिक अडचण दूर झाली. यानंतर विधानसभा निवडणुकीच्यावेळी अभिजीत पाटील यांनी पंढरपूर ऐवजी माढा विधानसभा मतदारसंघात उभारण्याची तयारी केली व अवघ्या तीन महिन्यांमध्ये मतदारसंघ पिंजून काढत बबनराव शिंदे यांच्यासारख्या जेष्ठ नेत्यासमोर मोठे आव्हान उभे केले. त्यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली व तो निर्णय योग्य ठरला. अभिजीत पाटील यांनी रणजीत बबनराव शिंदे यांचा ३० हजाराहून अधिक मतांनी पराभव केला व ते आमदार झाले. अभिजीत पाटील यांच्यामध्ये कारखाना चालवण्याची असणारी क्षमता व कसब तसेच ते राज्यभर चालवत असलेले कारखाने यासह त्यांचा मोठा जनसंपर्क व राजकीय महत्त्वाकांक्षा पाहता अभिजीत पाटील यांनी राजकारणात सक्रिय असावे असेच फडणवीस यांचे म्हणणे होते. यामुळेच त्यांनी आमदार पाटील यांना सहकार्य केले.
आमदार अभिजीत पाटील यांनी विधान भवनामध्ये सर्वच नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या असून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री अजित पवार , एकनाथ शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व अन्य नेत्यांनाही भेटले आहेत.
पाटील यांनी राजकारणात सर्वच राजकीय पक्षांशी आपला दोस्ताना कायम ठेवला आहे. त्यांचे अन्य पक्षातील नेत्यांशीही नेहमीच संबंध चांगले राहिले आहेत.

Header
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close