आधी कोरोना तर आता लंपीमुळे कार्तिकीतील जनावरांचा बाजार रद्द
पंढरपूर – मागील दोन वर्षे कोरोनामुळे पंढरपूरच्या कार्तिकी यात्रेत भरणारा जनावरांचा बाजार भरला नव्हता. तर आता जनावरांमध्ये लंपी आजारामुळे हा बाजार रद्द करण्यात आला आहे.
कार्तिकी यात्रेतील जनावरांचा बाजार प्रसिद्ध असून परराज्यातील पशुपालक येथे जनावर विक्रीसाठी आणत होते. कोरोनामुळे सलग दोन वर्षे हा बाजार भरु शकला नव्हता. तर आता लंपीचे संकट आहे.
सोलापूर सह महाराष्ट्र राज्यातील बऱ्याच जिल्हयामध्ये जनावरांना लम्पी स्कीन रोगाचा प्रादूर्भाव झालेला असल्याने जिल्हाधिकारी सोलापूर यांचृया आदेशाने बाधित जनावरांची वाहतूक करण्यांस, जनावरांचे बाजार भरविण्यास, जत्रा भरविण्यांस प्रतिबंध लागू केलेला असल्याने कार्तिक यात्रा २०२२ मध्ये दि. ०१/११/२०२२ ते दि. ०७/११/२०२२ अखेर वाखरी पालखी तळ येथे भरणारा जनावरांचा बाजार पंढरपूर बाजार समितीच्यावतीने रद्द करण्यात आलेला आहे. तरी सर्व शेतकरी बंधू, पशुपालक, जनावरांचे व्यापारी व सर्व संबंधित घटकांनी कार्तिक यात्रा जनावराच्या बाजारात कृपया आपली जनावरे खरेदी-विकीसाठी आणू नयेत, असे आवाहन बाजार समितीचे सभापती श्री. दिलीप (आप्पा) तुकाराम घाडगे व उपसभापती श्री. विवेक (काका) देविदास कचरे यांनी केले आहे.