येत्या आठवड्यातही सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये अनलॉकची स्थिती जैसे थै, पॉझिटिव्हिटी दर 5.12 टक्के
सोलापूर – कोरोनाची दुसरी लाट आता राज्यात ओसरू लागली असून अनलॉकची प्रक्रिया राबविली जात आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीणमधील कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट अजूनही 5.12 टक्के असल्याने तिसर्या टप्प्याप्रमाणे म्हणजेच सरत्या आठवड्याप्रमाणेच 21 जूनपासून सुरु होणाऱ्या आठवड्यात सवलती आणि निर्बंध कायम राहणार आहेत. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी रविवार 20 जून रोजी जारी केला आहे.
सोमवार ते शुक्रवार सर्व दुकाने दुपारी 4 पर्यंत सुरु राहतील तर शनिवारी व रविवारी केवळ अत्यावश्यक सेवा चालू राहतील.
राज्यात अॅनलॉकची प्रक्रिया 7 जूनपासून सुरू असून ज्या त्या स्थानिक प्रशासनांना तेथील परिस्थिती पाहून निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याचे पाच स्तर तयार करण्यात आले आहेत. सुरूवातीला पॉझिटिव्हिटी दर हा पाच टक्क्यांपेक्षा जास्त तसेच वापरण्यात आलेल्या ऑक्सिजन बेडची अॅक्युपन्सी पाहता जिल्हा तिसर्या टप्प्यात होता. यामुळे सर्व दुकाने सोमवार व शुक्रवार दुपारी चार पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली होती. तर शनिवार व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य अस्थापना बंदचा आदेश होता. यानंतर दुसर्या आठवड्यात सोलापूर शहराचा पॉझिटिव्हिटी दर कमी झाल्याने तेेथे आणखी मुभा देण्यात आली व आठवडाभर सर्व दुकानांना उघडण्यास परवानगी मिळाली होती. मात्र जिल्हा ग्रामीण भागाचा ( सोलापूर महापालिका वगळून) हा पॉझिटिव्हिटी रेट या 5.10 टक्के राहिल्याने या आठवड्यात ही ग्रामीणमध्ये निर्बंध कायम होते.
या सरत्या आठवड्यात जिल्हा ग्रामीणचा पॉझिटिव्हिटी दर 5.12 टक्के असून ऑक्सिजन बेडची ( अॅक्युपन्सी) दर ही 14.78 टक्के असल्याने ग्रामीण भागात अनलॉकची स्थिती ही मागील आठवड्याप्रमाणेच असणार आहे. सोमवार ते शुक्रवार सर्व दुकाने दुपारी चार पर्यंत सुरू राहतील तर शनिवार व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद राहणार आहेत.