विशेष

सहकार शिरोमणीबद्दलच्या तक्रारीसाठी अ‍ॅड. दीपक पवार थेट सहकारमंत्र्यांच्या भेटीला, सभासद यादी देण्याची केली मागणी


पंढरपूर–  सभासद काही फेरबदल केले गेले आहेत काय? याची माहिती मिळण्यासाठी सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याकडून याची माहिती मिळावी, अशी मागणी कारखान्याचे माजी संचालक अ‍ॅड. दीपक पवार यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली असून याबाबतचे निवेदन त्यांना प्रत्यक्ष भेटून दिले आहे.
दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर या कारखान्याची निवडणूक होणार आहे. हा कारखाना अध्यक्ष कल्याणराव काळे यांच्या ताब्यात असून अ‍ॅड. दीपक पवार हे त्यांना या कारखान्यात विरोध करत आहेत. तसेच कारखान्याच्या कारभारासंदर्भात तक्रारी पवार हे सतत करत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कारखान्याने 2018-19 मधील थकीत एफआरपीबाबत आवाज उठवत साखर  संचालकांना निवेदन दिले होते. आता अ‍ॅड. पवार यांनी थेट सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेवून त्यांनाच सभासदांची यादी मिळावी असे निवेदन दिले आहे. विशेष म्हणजे आता दीपक पवार व कल्याणराव काळे हे दोघेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच काम करत आहेत.
याबाबतच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, आपण या कारखान्याचे क्रियाशील सभासद असून माजी संचालक म्हणून काम केलेले आहे.  सन 2016 मध्ये कारखान्याच्या निवडणुकीमध्ये स्वतंत्र पॅनल उभा करून सत्ताधार्‍यांच्या विरोधात लढलो आहे. मागील निवडणुकीमध्ये कारखान्याने जवळपास एक हजार सभासदांना ऐनवेळी कमी केले होते व त्यांचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला होता. यानंतर अध्यक्षांनी सभांमध्ये बोलताना ती नावे चुकून कमी झाली असून निवडणुकीनंतर त्या लोकांना सभासद करून घेतले जाईल असा शब्द दिला होता मात्र तसे झालेले नाही. पूर्वइतिहास पाहता आतादेखील निवडणूक जवळ आल्याने असे होवू शकते. यासाठी वेळेत उपाययोजना करण्यात यावी तसेच सभासदांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आम्हाला कारखान्याकडून सभासदांच्या यादीविषयी माहिती  मिळणे गरजेचे असून याबबात संबंधितांना आदेश देण्यात यावेत अशी मागणी अ‍ॅड. पवार यांनी केली आहे.
कारखान्याचा सन 2019/20 चा तपासणी अहवाल (ऑडिट रिपोर्ट) तपासला असता त्यामध्ये जवळपास 1200 सभासद वाढवले गेल्याचे नमूद असून ते कार्यक्षेत्राबाहेरील असून चुकीच्या कागदपत्रांची जुळवाजुळव करून केवळ निवडणुकीसाठी त्यांना सभासदत्व दिले गेलेले आहे असा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.

Header

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close