विशेष

सोलापूर विधानपरिषदेत पराभवाची भीती असल्याने राष्ट्रवादीकडून अकलूज व नातेपुते नगरपरिषद स्थापनेला विरोध : धैर्यशील मोहिते पाटील यांचा आरोप


अकलूज – अकलूज आणि नातेपुते ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपरिषद आणि नगरपंचायतीत केले तर येत्या विधानपरिषद निवडणुकीत आपला आमदार निवडून येणार नाही या भीतीपोटी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेतेमंडळींनी याबाबतची मंजुरी अडवून ठेवली असल्याचा आरोप भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी अकलूज येथे केला.
अकलूज ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत व नातेपुतेचे नगर पंचायतीत रुपांतर करण्याच्या प्रक्रियेत महाराष्ट्र शासन अडथळा निर्माण करत असल्याच्या निषेधार्थ आज मंगळवार 22 जूनपासून प्रांत कार्यालय अकलूजच्या समोर अकलूज, माळेवाडी व नातेपुते नागरिकांनी बेमुदत साखळी उपोषणास सुरुवात केली आहे. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील, अर्जुनसिंह मोहिते पाटील, शिवतेजसिंह मोहिते पाटील, शीतलदेवी मोहिते पाटील, स्वरुपाराणी मोहिते पाटील, वैष्णवीदेवी मोहिते पाटील, बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे , विश्‍वतेजसिंह मोहिते पाटील, अकलूज सरपंच पायल मोरे, नातेपुते सरपंच कांचन लांडगे, उपसरपंच अतुल पाटील, माळेवाडी (अ) सरपंच जालिंदर फुले, उपसरपंच अरुण खंडागळे, रिपाइंचे प्रदेश उपाध्यक्ष नंदकुमार केंगार, कवाडे गटाचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले, शिवसेनेचे उपाध्यक्ष दत्तात्रय पवार, आण्णा कुलकर्णी, मुक्तार कोरबू यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक, व्यापारी संघटना व ग्रामस्थांनी या साखळी उपोषणाला पाठिंबा दिला.
धैर्यशील मोहिते पाटील  पुढे म्हणाले, इथली राष्ट्रवादीची मंडळी काँग्रेसच्या अडून आमच्यावर वार करत आहेत. बारामतीकरांच्या कानाशी लागून आम्ही मोहिते पाटलांच्या विरोधात सक्रिय असल्याचा फार्स करत आहेत आणि बारामतीकरही सोन्याच्या कानाचे असल्यामुळे आमची मंजुरी त्यांनी अडवली आहे. नगरपरिषदेच्या मंजुरीत अडथळा आणण्यासाठी आता इतर सात गावांना सामावून घेण्याची मागणी विरोधक करत आहेत. परंतु ज्यावेळी नगरपरिषदेचा प्रस्ताव पाठवताना हरकती मागवण्यात आल्या होत्या त्यावेळी विरोधक झोपले होते काय? आत्ताच विरोधासाठी विरोध म्हणून अडथळे निर्माण केले जात आहेत. पण आता अकलूज, माळेवाडी व नातेपुतेची जनता आता मंजुरी मिळविल्याशिवाय उपोषण सोडणार नाही.


पालख्या अडविण्याचा इशार
अकलूज व नातेपुते नगरापरिषद व नगरपंचायतीची मंजुरी तातडीने मिळाली नाही तर आम्ही पंढरपूरला जाणार्‍या संतांच्या पालख्या अडवून धरणार आहोत. शासनाने या गोष्टीची दखल घ्यावी असा इशारा यावेळी उपोषणाला बसलेल्या नागरिकांनी दिला.

Header

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close