सहकार शिरोमणी कारखाना निवडणूक, 186 जणांनी अर्ज घेतले तर 20 दाखल
पंढरपूर – तालुक्यातील भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली असून शुक्रवारी पहिल्याच दिवशी इच्छुकांनी 186 अर्ज घेतले असून वीस जणांनी उमेदवारी दाखल केली आहे. यात डॉ.बी.पी.रोंगे यांचा समावेश आहे.
सहकार शिरोमणी कारखान्याची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असे दिसत आहे. पहिल्याच दिवशी विक्रमी अर्ज सभासदांनी घेतले आहेत. पहिल्या दिवशी जे वीस अर्ज दाखल झाले आहेत. ते गटनिहाय पुढील प्रमाणे – भाळवणी 9, भंडीशेगाव 4, गादेगाव 1, कासेगाव 2, सरकोली 2, महिला 1 तर भटक्या विमुक्त मतदारसंघातून 1 अर्ज दाखल झाला आहे.
भाजपाचे नेते तथा स्वेरी कॉलेजचे प्रमुख डॉ. बी.पी.रोंगे यांनी कासेगाव गटातून उमदेवारी अर्ज दाखल केला आहे. ते विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्यासमवेत या कारखाना निवडणुकीत पॅनल लावत आहेत. आज सर्वाधिक अर्ज भाळवणी गटातून नऊ दाखल झाले असून यात गोरख हरिबा जाधव, अरूण कुंडलिक नाईकनवरे, नागनाथ गोरख नाईकनवरे, महादेव उत्तम देठे, विलास महादेव देठे, विजय रघुनाथ भिंगारे, सुनील बाळकृष्ण भिंगारे, आप्पा मोहन भिंगारे यांचा समावेश आहे. भंडीशेगाव गटातून धनंजय उत्तम काळे, पोपट माणिक पवार, बाबासाहेब शिवाजी काळे, सचिन उत्तम काळे यांनी तर गादेगाव गटातून भारत सोपन कोळकर यांचा अर्ज दाखल झाला आहे. कासेगाव गटातून डॉ.बी. पी. रोंगे यांनी तर सरकोली गटातून आण्णा गोरख शिंदे व निवास कृष्णा भोसले यांचे अर्ज दाखल झाले आहेत.महिला गटातून अनिता नंदकुमार बागल यांचा तर भटक्या विमुक्त मतदारसंघातून रायाप्पा धोंडिबा हळणवर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
या कारखान्यासाठी 10 हजार 883 सभासद असून मागील निवडणूक तिरंगी झाली होती. यंदाही अशीच स्थिती असून सत्ताधारी कल्याणराव काळे यांच्यासमोर अभिजीत पाटील व डॉ.बी.पी.रोंगे यांच्या पॅनलसह अॅड. दीपक पवार यांच्या गटाचे आव्हानं असणार आहे. विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील हे या कारखान्याचे सभासद नाहीत मात्र त्यांनी रोंगे यांना पुढे करत येथे कल्याणराव काळे यांच्यासमोर आव्हानं उभे केले आहे. या निवडणुकीत पाटील व अॅड. दीपक पवार हे एकत्र यावेत, यासाठी प्रयत्न सुरू असले तरी जागा वाटपावर अद्याप एकमतं नसल्याचे दिसत आहे. यामुळेच पवार यांनी अर्ज घेतल्यानंतर स्वतंत्र लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
पत्रकारांशी बोलताना अॅड. दीपक पवार म्हणाले, मी सात आठ वर्षांपासून सहकार शिरोमणीच्या सभासदांच्या हक्कांसाठी लढा देत आहे. मी गावोगावी फिरून त्यांच्या संपर्कात आहे. काळे हटावसाठी मी अन्य गटांशी चर्चा करून दोन पावले मागे येण्यासही तयार आहे. मात्र त्याचवेळी आमचे संपूर्ण पॅनलही तयार आहे. ही निवडणूक सभासदांनीच हातात घेतली असून आमचा विजय निश्चित आहे.