विशेष

श्री पांडुरंग  पालखी सोहळ्याचे मुक्ताईनगरकडे प्रस्थान !
करमाळा, अहमदनगर व औरंगाबादमध्ये उत्साहात स्वागत

पंढरपूर – टाळ, मृदुंगाचा गजर व हरीनामाचा जयघोष करीत श्री संत मुक्ताबाईंच्या 726 व्या अंतर्धान समाधी सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी श्री अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्री पांडुरंगराय  पादुका पालखी सोहळ्याने शुक्रवार 12 मे रोजी सकाळी 7 वाजता श्री क्षेत्र मुक्ताईनगरकडे प्रस्थान ठेवले. पहिल्या मुक्कामासाठी सायंकाळी हा सोहळा औरंगाबाद येथे विसावला.
शुक्रवारी सकाळी 6 वाजता  श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या विश्‍वस्त शकुंतला नडगीरे  यांच्या हस्ते श्री विठ्ठल पादुकांची विधीवत प्रस्थान पूजा करण्यात आली. यानंतर प्रस्थान ठेवण्यात आले.
अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे  व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्थान सोहळ्याचे पौरोहित्य संदीप कुलकर्णी व मेघराज वळखे पाटील यांनी केले. यावेळी नित्योपचार विभाग प्रमुख संजय कोकीळ , श्री संत मुक्ताई संस्थांचे अध्यक्ष  रवींद्र  पाटील, संदीप पाटील, संग्राम पाटील,  मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे,  भागवत धर्म प्रचारक समितीचे अध्यक्ष  सूर्यकांत भिसे उपस्थित होते.
पांडुरंगाच्या पादुका विठ्ठल मंदिरातून मुख्य मंडपात आणण्यात आल्या. विश्‍वस्थ शकुंतला नडगीरे यांनी या पादुका अ‍ॅड.रवींद्र पाटील यांच्याकडे सुपूर्द केल्या व पालखी ठेवण्यात आल्या. यावेळी र श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व हा सोहळा करमाळ्याकडे मार्गस्थ झाला.
सकाळी 10.30 वाजता पालखी सोहळा करमाळा येथे पोहोचला. येथे दत्त मंदिरात पालखी सोहळ्याचे स्वागत प्रवीण  कटारिया, सुधीर कटारिया, सचिन कटारिया, संजय भालेराव, सत्यभामा बनसुडे, संजय शिंदे यांनी केले. वारकर्‍यांनी येथे सकाळची न्याहरी केली व . सोहळा अहमदनगरकडे मार्गस्थ झाला.
श्री पांडुरंगाचा पालखी सोहळा नगर येथील दिल्ली गेटजवळ पोहोचल्यानंतर मोठ्या उत्साहात सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. तेथून भव्य मिरवणूक काढण्यात आली. दुपारी हा सोहळा येथील श्री सिद्धेश्‍वर महादेव मंदिरात पोहोचला. सायंकाळी श्री पांडुरंग पादुका पालखी सोहळ्याचे औरंगाबाद शहरामध्ये आगमन झाल्यानंतर सोहळ्याचे मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. गारखेडा येथील श्री गजानन महाराज संस्थानच्याज मंदिरात पालखी सोहळा पोहोचल्यानंतर संस्थानसह भाविकांनी सोहळ्याचे स्वागत केले. समाज आरतीनंतर वारकर्‍यांना अन्नदान करण्यात आले. रात्रौ किर्तनाची सेवा झाल्यानंतर सोहळा येथे विसावला.शनिवार  13 रोजी सिल्लोड, जामनेरमार्गे हा सोहळा भुसावळ मुक्कामी पोहोचेल. येथे श्री पांडुरंग, संत नामदेव महाराज व संत निवृत्तीनाथांच्या भेटीचा सोहळा होईल. पालखी सोहळ्यामध्ये 100 वारकरी सहभागी झाले आहेत.

726 वा अंतर्धान समाधी सोहळा
श्री संत मुक्ताबाईंचा 14  मे रोजी 726  वा अंतर्धान समाधी सोहळा आहे. या समाधी सोहळ्यासाठी प्रत्यक्ष पांडुरंग, संत निवृत्तीनाथ, संत नामदेव संत उपस्थित होते असे अभंगात वर्णन केले आहे. याप्रमाणे संत नामदेवांच्या पादुका घेवून नामदेव महाराजांचे वंशज गेली शेकडो वर्षे या सोहळ्यासाठी उपस्थित राहतात. नामदेव महाराजांचे वंशज ह.भ.प.गुरूवर्य केशवदास नामदास महाराज पंढरपूर यांचे येथे समाधी सोहळ्याचे किर्तनही होते.

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close