उजनी वगळता सर्व मोठी धरण अद्यापही “प्लस” मध्ये, सोलापूर जिल्ह्यासाठी चिंतेचा विषय
पंढरपूर – सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणार्या उजनी मे च्या मध्यात वजा दहा टक्के पाणी स्थिती असून भीमा नदीत सोडलेले पाणी पाहता धरणाची टक्केवारी आणखी कमी होणार आहे. तर आता कालवा बंद होणार आहे. याचवेळी उन्हाची तीव्रता कमालीची वाढली असून येत्या काही दिवसांत पिकांना पाण्याची गरज भासणार आहे, मात्र जलसाठा पाहता पुन्हा मिळणे अवघड होणार असल्याने लाभक्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान पुणे विभागातील अन्य प्रकल्पांचा विचार केला तर ती सर्व अद्यापही उपयुक्त पातळीत आहेत.
उजनीचा कालवा सतत सुरू असल्याने धरण यंदा एक महिना अगोदरच मृतसाठ्यात पोहोचले आहे. लाभक्षेत्रातील शेतकरी ही पाणी सोडण्याच्या पध्दतीवर आश्चर्य व्यक्त करत आहेत. वास्तविक पाहता पंधरा मे नंतर उन्हाची तीव्रता जेंव्हा वाढते तेंव्हा जर सिंचनाला पाणी दिले तर याचा उपयोग होतो. मात्र यंदा सलग कालवा सुरू असून तो आता बंद करण्याची तयारी सुरू झाली आहे. अन्य योजनांचे विसर्ग ही घटविण्यात आले आहेत. भीमा नदीत पाणी सोडल्याने धरण किमान दहा ते अकरा टक्के खालावणार असून 14 मे रोजी ते वजा 8.63 टक्के होते. सध्याच मृतसाठ्यातील 4.62 टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. एकूण पाणीसाठा सध्या 59 टीएमसी एवढा मृतपातळीत शिल्लक आहे.
दहिगाव योजनेसाठी सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात आले आहे तर सीना भीमा जोडकालव्यातील विसर्ग 450 क्युसेकवर आणण्यात आला आहे. मुख्य कालव्यात 3 हजार क्युसेेकने पाणी सोडले जात आहे तर नदीत 6 हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. नदीतील पाणी पंढरपूरपर्यंत पोहोचले आहे.
दरम्यान यंदा उजनी धरणाने मृतसाठ्यात आपला लवकर प्रवास सुरू केला असला तरी पुणे विभागातील व निरा खोर्यातील सर्व प्रकल्पांमध्ये अद्यापही उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षीचा विचार केला तर उजनी धरण याच तारेखाला उपयुक्त पातळीत 13.93 टक्के अशा स्थितीत होते.
पुणे विभागातील धरणांमधील आजचा उपयुक्त पाणीसाठा ( 14 मे 2023)
डिंभे -22.19 टक्के, भामा आसखेडा 40.73, येडगाव 33.68, चासकमान 17.80, पिंपळगाव जोगे 29.85, वडज 18.51, माणिकडोह 10.45 , घोड 3.15, पवना 26.94, खडकवालसा 56.84, पानशेत 22.18, वरसगाव 42.44, टेमघर 5.89, मुळशी 23.34 टक्के.
निरा खोर्यातील धरणातील उपयुक्त साठा
निरा देवघर 33.32 टक्के, भाटघर 12.59, वीर 44.62 तर गुंजवणी 31.98 टक्के.
अन्य महत्वाच्या धरणातील आजचा पाणीसाठा
कोयना 25.31 टक्के, धोम बलकवडी 19.28, तराळी 58.59, कण्हेर 29.92, उरमोडी 42.71, राधानगरी 29.72, तुळशी 37.74 टक्के.
गतवर्षीच्या तुलनेत उजनीत 22 टक्के कमी पाणी
उजनीतून उन्हाळा हंगामात सतत कालवा सुरू राहिल्याने धरणातील पाणी झपाट्याने कमी झाले असून सध्या धरण वजा 8.63 टक्के पाणी स्थितीत आहे. मागील वर्षी याच तारखेला धरणात उपयुक्त पातळीत 13.93 टक्के पाणी साठा होता. याचा विचार केला तर यंदा किमान 22 टक्के पाणी कमी आहे. सध्याही कालवा सुरू असून अन्य योजनातील पाणी कमी करण्यात आले आहे. तर धरणातून नदीत सोलापूरसह भीमाकाठच्या योजनांसाठी सहा हजार क्युसेकने पाणी सोडणे सुरू आहे.