राजकिय

“सहकार शिरोमणी” ची निवडणूक पंढरपूर तालुक्याच्या राजकारणाची दिशा ठरविणार !


पंढरपूर तालुका हा उसाचा कॅलिफॉर्निया म्हणून प्रसिध्द आहे. येथील राजकारणात साखर कारखान्यांचे अनन्य साधारण असे महत्व असून येथील सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका या विधानसभेप्रमाणे चुरशीच्या होतात. मागील तीस वर्षात कधी नव्हे एवढी चुरस सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत यंदा निर्माण होण्याची शक्यता आहे. विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांची असणारी महत्वकांक्षा पाहता येथे रणधुमाळी होणार हे निश्‍चित आहे. या निवडणुकीवर तालुक्याच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे.
विठ्ठल सहकारी साखर कारखाना एकट्याने लढून जिंकून दाखविल्याने व नंतर गळीत हंगाम यशस्वीरित्या पार पाडणाऱ्या अभिजित पाटील यांनी सहकार शिरोमणी कारखान्यात उतरण्याचा निर्धार पक्का केला आहे. विद्यमान अध्यक्ष असणाऱ्या कल्याणराव काळे यांच्यावर नाराज असणाऱ्यांची मोट बांधण्याची तयारी ते करत आहेत. तर दुसरीकडे काळे यांना कारखाना निशिगंधा बँक व यशवंतराव चव्हाण पतसंस्थेप्रमाणे बिनविरोध होर्इल, अशी आशा आहे. अभिजित पाटील यांना विठ्ठल परिवाराचे नेतृत्व एकमुखी आपल्याच हाती हवे आहे. यात कल्याणराव काळे हे अडसर ठरत आहेत.
पंढरपूर तालुक्यातील राजकारणाचा मंगळवेढा, सांगोला ,माढा व मोहोळ या मतदारसंघांवर परिणाम होतो. तसेच लोकसभेला सोलापूर व माढा या दोन्ही ठिकाणी हा तालुका विभागला आहे. यामुळे येथील नेतृत्व हे नेहमीच चर्चेत असते. अभिजित पाटील यांनी पंढरपूर भागात बस्तान बसविले तर दुसरीकडे सांगोल्यात कारखाना चालवत आपली ताकद निर्माण केली आहे. त्यांची तयारी पंढरपूर – मंगळवेढा विधानसभेला उभारण्याची आहे. अशात विठ्ठल कारखान्याबरोबर सहकार शिरोमणी आपल्या ताब्यात आल्यास येथील राजकारणात त्यांचे स्थान आणखी बळकट होर्इल, असे त्यांना वाटते. विठ्ठल कारखाना निवडणुकीत त्यांनी भगीरथ भालके, कल्याणराव काळे तसेच  युवराज पाटील या दोन्ही पॅनलचा पराभव केला होता. आता ते सहकार शिरोमणीत काळे यांना आव्हानं देवू पाहात आहेत.
पाटील यांनी विठ्ठल कारखाना व्यवस्थित चालवत सुमा सव्वा सात लाख टन ऊस गाळला आहे तर शेजारच्या सांगोला कारखान्यात ही अडीच लाख टनाचे गाळप केले आहे. यामुळे सहाजिकच त्यांच्यावर शेतकऱ्यांचा विश्‍वास आहे. याच जोरावर ते सहकार शिरोमणीच्या सभासदांना साद घालत आहेत. तर दुसरीकडे कल्याणराव काळे हे राष्ट्रवादीचे नेते आहेत. ते जवळपास 22 वर्षाहून अधिक काळ चेअरमन असून त्यांना इतका प्रखर विरोध यापूर्वी झालेला नाही. ॲड. दीपक पवार मागील काही वर्षे काळे यांना विरोध करत असले तरी त्यांना यश आलेले नाही. मात्र  अभिजित पाटील हे तयारीनिशी निवडणुका लढवित असल्याने त्यांची भूमिका फार महत्वाची आहे.
पाटील यांची ताकद वाढू नये, यासाठी त्यांचे विरोधक प्रयत्न करणार हे निश्‍चित आहे. यासाठी व्यूहरचना आखल्या जाणार. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र.. याची अंमलबजावणी होणार हे निश्‍चित आहे. मात्र दहा हजाराच्या आसपास सभासद असणाऱ्या या कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांच्या मनात काय आहे यावर सारे अवलंबून आहे. तालुक्यात यापूर्वी अनेक दिग्गज नेते एका बाजूला असताना अनेक निवडणुकांचे निकाल धक्कादायक लागले आहेत. यात विधानसभा व कारखान्यांच्या निवडणुकांचा समावेश आहे.
यातच काळे यांनी ऐन विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपा सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यामुळे या पक्षाचे नेते काय भूमिका घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. यातच  पाटील हे कधी भाजपाच्या तर कधी राष्ट्रवादीच्या जवळ दिसतात. त्यांची वाढत ताकद पाहता दोन्ही पक्ष त्यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळेच सहकार शिरोमणीच्या निवडणुकीवर बरेच काही अवलंबून असून यानंतरच तालुक्याच्या राजकारणाची दिशा निश्‍चित होणार आहे. शेवटी सारे सभासदांच्या हाती  आहे.  

Header
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close