भाजपा ला पश्चिम महाराष्ट्रात झटका बसणार? , आ. रणजितसिंहांच्या भूमिकेकडे सार्यांचे लक्ष
पंढरपूर – माढा लोकसभा मतदारसंघात भाजपाने उमेदवारी नाकारल्याने तसेच पुन्हा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच संधी दिल्याने नाराज झालेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून शरद पवार यांनीच हे जाहीर केल्याने ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पश्चिम महाराष्ट्रात भाजपाला हा झटका मानला जात आहे. अनेक ठिकाणची बंड थंड झाली असली तरी अकलूजकरांच्या भूमिकेमुळे अनेक नाराज नेते भाजपा पासून दूर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अत्यंत सस्पेन्स ठेवत भाजपा व विरोधकांना जवळपास पंधरा ते वीस दिवस वेटिंगवर ठेवत मोहिते पाटील यांनी मतदारसंघाचा अंदाज घेत आपला निर्णय जाहीर केला आहे. दरम्यान भाजपाचे विधानपरिषद सदस्य असणारे त्यांचे बंधू आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची यानंतरची भूमिका काय असणार याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे. या घटनाक्रमांवर आजवर रणजितसिंह मोहिते पाटील यांनी वाच्यता केलेली नाही.
मोहिते पाटील यांनी माढा मतदारसंघात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध केल्यानंतर फलटण भागात संजीवराजे निंबाळकर समर्थकही आक्रमक झाले होते. त्यांनी ही विद्यमान खासदारांच्या उमेदवारीला विरोध केला होता. यामुळे सोलापूर व सातारा भागात भाजपाच्या उमेदवारीच्या निर्णयाविरोधात वातावरण चांगलेच तापले आहे. आता उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत सुरू होत असताना धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. याच दरम्यान पुणे व परिसरातील काही नेत्यांनी आज पवार यांच्या उपस्थितीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. काही नेते येत्या दोन तीन दिवसात येतील ,असे सांगण्यात आले.