राजकिय

आमदारांवर जबाबदारी ! लोकसभेच्या मताधिक्यावर विधानसभेची उमेदवारी

माढा लोकसभा मतदारसंघ हा राज्यातील हॉटस्पॉट मानला जात असून येथे भाजपा व महायुती अंतर्गत निर्माण झालेला तिढा अद्यापही तसाच आहे. मोठी ताकद असतानाही महायुतीतील धुसफूस मिटवताना वरिष्ठांना लोकसभेच्या मताधिक्क्यावरच विधानसभेच्या उमेदवारीचा विचार केला जाईल, असा सूचक इशारा दिल्याने आता सारेच नेते कामाला लागले आहेत. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी सर्वच घटकपक्ष आपली प्रचार यंत्रणा राबवू लागले आहेत.
माढ्यातून पुन्हा खा. निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराज झालेल्या अकलूच्या मोहिते पाटील यांनी वेगळा रस्ता धरल्याचे चित्र आहे. भाजपासून ते अधिकृतरित्या बाजूला गेले नसले तरी पक्षाच्याबरोबर ही ते दिसत नसल्याने संभ्रम आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांची सध्याची व्यूहरचना पाहता ते लोकसभा लढविण्याच्या तयारीत आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून की अपक्ष लढणार याबाबत सस्पेन्स कायम आहे. फलटणचे संजीवराजे निंबाळकर हे देखील खा. निंबाळकर यांच्या उमेदवारीमुळे नाराज आहेत. रामराजे निंबाळकर यांनी खा. रणजितसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध केला होता.
आता भाजपाने खा.  निंबाळकर यांचा प्रचार सुरू केला असून वरिष्ठ पातळीवरून यंत्रणा हलविल्या जात आहेत. विधानसभानिहाय मेळावे, कार्यकर्ता व बूथ कमिटी बैठका सुरू आहेत. महायुतीमधील घटकपक्ष असणार्‍या राष्ट्रवादी काँगे्रस अजित पवार गटाची ताकद या मतदारसंघात जास्त असून आमदारद्वय बबनदादा शिंदे व संजयमामा शिंदे यांच्यावर मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे. 2019 ला संजयमामा शिंदे यांना करमाळा व माढ्यात मताधिक्क्य होते. आता 2024 ला त्यांना निंबाळकर यांच्यासाठी मतं मागावी लागत आहेेत.
माळशिरस तालुक्यावर पकड असणारे मोहिते पाटील पक्षापासून दूर जात असल्याचे चित्र असल्याने 2019 येथून जे लाखाहून अधिकचे मताधिक्य मिळाले होते ते आता राखणे अवघड असल्याने करमाळा, माढा, सांगोला व पंढरपूरचा भाग तसेच माण खटाव भागावर जास्त लक्ष केंद्रीत केले जात असल्याचे चित्र आहे.  फलटण भागात रामराजे निंबाळकर यांची ताकद जास्त आहे. मात्र त्यांचे व खा. निंबाळकर यांचे जमत नाही.
भाजपा आता मतदारसंघात ताक ही फुकूंन पीत असल्याचे चित्र आहे. पंढरपूर भागात परिचारकांच्या पांडुरंग परिवाराबरोबरच माढा विधानसभेला जोडलेल्या तालुक्यातील गावांमधील आमदार बबनराव शिंदे समर्थकांचे वेगळे मेळावे घेण्यात आले आहेत. सर्व गटतट यांना चार्ज केले जात असून प्रचार यंत्रणेत सहभागी करून घेतले जात आहे. सांगोला भागात निंबाळकर यांचे मित्र असणारे आमदार शहाजीबापू पाटील व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील यांच्यावर प्रचाराची जबाबदारी टाकण्यात आली आहे. कार्यकर्त्यांचे मेळावे सांगोल्यातूनच  सुरू करण्यात आले होते.
मागील निवडणुकीत निंबाळकर यांना साथ करणारे मोहिते पाटील बरोबर नाहीत, असे गृहित धरूनच नियोजन केले जात आहे. वरिष्ठ पातळीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांनी आमदार, पदाधिकारी यांना कानपिचक्या दिल्या आहेत. शिंदे शिवसेनेने कालच पंढरपूरमध्ये निंबाळकर व सातपुते यांच्या समर्थनार्थ मोठा मेळावा घेत महायुती एकसंघ असल्याचे दाखवून दिले आहे. काहीच दिवसांपूर्वी या पक्षाचे नेते प्रा. शिवाजीराव सावंत यांनी खा. निंबाळकर यांची उमेदवारी बदलाची मागणी करून खळबळ उडवून दिली होती. मात्र आता ते  प्रचारात सक्रिय झाले आहेत.
बारामतीप्रमाणे माढ्याची जागा भाजपाने प्रतिष्ठेची केली असून येथील वाद मिटविण्याचे प्रयत्न झाल्यानंतर आता महायुतीच्या आमदारांवर ही जागा जिंकून आणण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. क्लस्टरप्रमुख प्रशांत परिचारक हे  प्रचार यंत्रणेचे नियोजन करत आहेत. ही विधानसभा निवडणुकीची चाचणी असल्याने आमदार ही कामाला लागले आहेत. माळशिरसचे आमदार राम सातपुते हे सोलापूरचे उमेदवार असले तरी त्यांचे कार्यकर्ते निंबाळकर यांच्यासाठी काम करत आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे  नेते उत्तमराव जानकर यांना प्रचारात उतरविण्यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे. सध्या ते गावभेट दौरे करत आहेत.   

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close