शेतकरी ऊसबिलासाठी “या” कारखान्याच्या चेअरमनना रक्ताची शाई करुन लिहिणार पत्र..
…राजेवाडीच्या कारखान्याने उर्वरित ऊस बिल द्यावे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भावनिक साद
पंढरपूर – राजेवाडी येथील सदगुरू श्री श्री श्री साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे मागील गाळप हंगामातील उर्वरित 223- रुपये प्रतिटन ऊस बिल द्यावे व कोरोनानंतर साजरी होणारी शेतकऱ्यांची पहिलीच दीपावली गोड करावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह माळशिरस तालुक्यातील 200 शेतकरी कारखाना कार्यस्थळावर जाऊन स्वतःच्या रक्ताची शाई करुन कारखान्याचे चेअरमन एन. शेषागिरी राव यांना ही 200 पत्र भेट देऊन त्यांचा शाल ,श्रीफळ व फेटा बांधून गांधीगिरीने सत्कार करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष अजित बोरकर यांनी दिली
यावेळी बोलताना अजित बोरकर म्हणाले की, मागील गाळप हंगामात राजेवाडीच्या सदगुरु साखर कारखान्याने शेतकऱ्यांना 2660/- रुपये प्रति टन ऊस बिल देतो असे गावोगावी जाऊन सांगितले आणि प्रत्यक्षात मात्र 2437/- रुपये बिल देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली आहे. वास्तविक पाहता उर्वरित 223/- रुपये प्रति ऊसबिल दीपावलीच्या अगोदर देणे क्रमप्राप्त असताना उर्वरित ऊस बिल दिले जात नाही. याबाबत वारंवार भेटून विनंती करूनही कारखाना प्रशासन व चेअरमन यांनी झोपेचे सोंग घेतले आहे. यामुळे शेवटचा पर्याय म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेकडो कार्यकर्ते राजेवाडी येथील सद्गुरु श्री श्री साखर कारखान्यावर जाऊन चेअरमन एन. शेषागिरी राव यांना कारखाना कार्यस्थळावरच स्वतःचे रक्त काढून 200 पत्र देणार आहेत .