Uncategorizedराजकिय

आमदार समाधान आवताडे यांनी घेतली  युवराज पाटील यांची भेट, बराच वेळ चर्चा

पंढरपूर –  श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तथा माजी पंचायत समिती सदस्य  युवराज पाटील यांची आमदार समाधान आवताडे यांनी त्यांच्या  निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.

मतदारसंघातील आगामी विकासाच्या कार्ययोजनांवर यावेळी सखोल आणि महत्वपूर्ण चर्चा झाली. युवराज पाटील यांनी तालुक्यात विकासासाठी  केलेले भरीव प्रयत्न, समाजहितासाठी घेतलेले निर्णय आणि कार्यकर्त्यांसोबत असलेली त्यांची बांधिलकीही निश्चितच कौतुकास्पद आहे, असे आमदार समाधान आवताडे यांनी समाज माध्यमांवर टाकलेल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले आमदार समाधान आवताडे हे आता पंढरपूर तालुक्याच्या राजकारणातही लक्ष घालू लागले आहेत,असे दिसत आहे. माढ्याचे आमदार अभिजीत पाटील हे माढ्याबरोबरच पंढरपूर व मंगळवेढा भागातही सतत दौरे करून आपला जनसंपर्क वाढवत आहेत. तर आता आमदार अवताडे यांनी पंढरपूर तालुक्यातील मातब्बर नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे.

येत्या काही महिन्यात पंढरपूर नगरपरिषदेसह पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही होणार आहेत हे पाहता आता सर्वच राजकीय पक्ष व गट हे आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. यातच आता आमदार आवताडे यांनी युवराज पाटील यांची सदिच्छा भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली.

युवराज पाटील हे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक , माजी आमदार स्व. औदुंबरआण्णा पाटील यांचे नातू आहेत. ते पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात व सहकार क्षेत्रात काम करत आहेत.  विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या मागील निवडणुकीत त्यांनी आमदार अभिजीत पाटील यांना आव्हान दिले होते. तत्पूर्वी त्यांनी आमदार स्व. भारतनाना भालके यांच्या समवेत काम केले आहे.

विधानसभा निवडणुकीपासून पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात अनेक बदल घडले आहेत. अभिजीत पाटील हे माढ्याचे आमदार झाले आहेत. यामुळे त्यांनी आता माढा तालुक्याबरोबरच पंढरपूरच्या राजकारणातही लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. हे पाहता येत्या काळात या तालुक्यात राजकीय गटांमध्ये व पक्षांमध्ये शह-काटशहाच राजकारण पुन्हा दिसणार हे निश्चित आहे. यासाठीच आमदार समाधान आवताडे यांनी युवराज पाटील यांची घेतलेली भेट व झालेली चर्चा यास महत्त्व प्राप्त झाले आहे. आज दिवसभर याच विषयावर तालुक्यात चर्चा सुरू होती.

Header
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close